लॉक डाऊन च्या स्थितीत आहे तिथेच थांबा धोकादायक प्रवास करू नका-
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन
लातूर:( प्रतिनिधी) महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे, वाहतूक व्यवस्था बंद आहेत, या स्थितीत सर्वांनी आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहावे तेथेच त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल या स्थितीत कोणीही आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवासाचे प्रयत्न करू नयेत असे आवाहन वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.या संदर्भाने बोलताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की राज्यात आणि देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक जण दुचाकी तीन चाकी व इतर वाहनांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत.अशा प्रकारामुळे पोलीस व इतर यंत्रणेचाही ताण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आहे त्याच शहरात, गावात राहून स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आणि तत्पर आहे. काही अडचण आल्यास स्थानिक प्रशासन यंत्रणेशी संपर्क साधल्यास आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.काही ठिकाणी मुलाबाळांच्या चिंतेमुळे आई-वडील त्यांना घरी बोलताना दिसत आहेत, यातून त्या मुलांचीच असुरक्षितता वाढत आहे त्यामुळे या मुलांना गावी बोलण्यापेक्षा आहे तिथेच सुरक्षित राहावा असे सांगणे गरजेचे आहे.
लातूर जिल्हा व महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्या मुलां-मुलींना,नातेवाईकांना आहे तिथे थांबू द्यावे त्यांना काही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाकडे संपर्क करावा असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.
0 Comments