आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू.घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा.शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचारी, बँका, वित्तीय संस्था सुरु
मुंबई:(प्रतिनिधी) कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं.त्याला मुंबई,ठाणे,पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.संपूर्ण राज्यात रस्त्यांवर,लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने राज्यात कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे.
दरम्यान,कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.राज्यात कलम १४४ लागू करण्यात आलं असून, ५ पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले, या रोगाच्या प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे.ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, "आज ९ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. अनेकांना तो नंतर संपेल असे वाटेल. पण हा संयम उद्या पहाटेपर्यंत असाच कायम ठेवायचा आहे. त्यासाठी रात्री ९ वाजल्यानतंर बाहेर पडू नका. दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे. ही संख्या आपल्याला थांबवायची आहे. त्यामळे उद्या सकाळपासून मी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर राज्यातील संपूर्ण नागरी भागात आज मध्यरात्रीपासून १४४ कलम नाईलाजाने लावत आहे.आज मध्यरात्रीपासून परदेशातून देशात कोणीही येणार नाहीत. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये विदेशातून आली आहेत त्यांना समाजात फिरू नका, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही समाजात फिरू नका असे आवाहन त्यांनी केले.तसेच शहरातील बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी आहे. करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढतो त्यामुळे अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगताना गरज पडली तर लॉकडाऊन ३१ मार्च नंतर वाढवण्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. जीव वाचवणं आत्ता महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू
आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे.
जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.
महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.
रेल्वेसेवा, खासगी बस सेवा, एसटी बससेवा बंद करीत आहोत.
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील.
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील.
शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.
ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका.आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.
३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर जमावबंदीचा निर्णय घेण्यात येईल
सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा सुरु राहील, पण भाविकांसाठी बंद
अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती
पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.
0 Comments