दुष्काळग्रस्त शेतमजूरांना आर्थिक मदत मिळण्यासाठी फकिरा ब्रिगेडचे धरणे
बालाजी उबाळे
लातूर: शासनाचे धोरण आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे महाराष्ट्रातील शेती व्यवसाय धोक्यात आला असून महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतमजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्याप्रमाणे शेतमजूरांनाही आर्थिक मदत करावी. या मागणीसाठी फकिरा ब्रिगेड या संघटनेच्यावतीने प्रा. डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात लातूरच्या जिल्हाधिकाऱ्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात फकिरा ब्रिगेडने म्हटले आहे की, भारतातील ९०% शेतमजूर, आदिवासी, दलित समाजातील असून त्यांचे सामाजिक शोषणाबरोबर आर्थिक शोषणही होत आहे. परंतु केंद्र आणि राज्यशासन या शेतमजूर वर्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्यांची प्रचंड उपेक्षा केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतमजूरांमध्ये शासनाच्या धोरणाबद्दल प्रचंड असंतोष पसरला असून हा असंतोष संघटीत करून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. याची सुरुवात लातूर येथून होत आहे. शेतमजूरांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी याबरोबर मातंग आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, मागासवर्गीयासाठी असलेल्या सर्व महामंडळाकडून लाभार्थ्यांना कर्ज मिळावे, घटनात्मक आरक्षणातील लोकांना पदोन्नती मिळावी, अनुसुचित जातीच्या आरक्षणाचे लोकसंखेच्या प्रमाणात वर्गीकरण करावे, दलीतांवरील वाढते अन्याय अत्याचार थांबवावेत गायरान धारकांच्या नावे जमीनी कराव्यात, बार्टीच्या धरतीवर आटींची स्थापना करावी, १००% शेतमजूरांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा लाभ द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या त्वरीत मंजूर करून तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनाचे संयोजक प्रा. राजेंद्र लोदगेकर, संजय विरुळे, नंदकुमार राऊत, पांडूरंग मस्के, संतोष पटनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात श्रीरंग सरवदे, अविनाश लोंढे, अविनाश साठे, बाळासाहेब उकंडे, शरद देडे, गहिनीनाथ मस्के, वसंत कांबळे, हिरालाल कांबळे, धनाजी देडे, शिरीष होळकर, दगडू कांबळे, बालासाहेब वाघमारे, गोविंद कोटंबे, राम देडे, प्रविण सुर्यवंशी, दत्ता साठे, चंद्रसेन कांबळे, मोहन जाधव, दिपक कांबळे, शरद धबडगे, गोविंद घबड़गे आदी प्रमुख कार्यकर्त्यासह ग्रामीण भागातील शेकडो शेतमजूर सहभागी झाले होते.
0 Comments