Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यात सद्यस्थितीत 86 कोरोना रुग्ण; गत चार दिवसात 61 रुग्ण आढळले

लातूर जिल्ह्यात सद्यस्थितीत 86 कोरोना रुग्ण; गत चार दिवसात 61 रुग्ण आढळले

लातूर: लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 86 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, गेल्या चार दिवसातली आकडेवारी पाहिली तर ती आकडेवारी निश्चितच चिंतेत पाडणारी आहे. मागील चार दिवसात तब्बल 61 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे असून, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. 2019 पासून संपूर्ण जग कोरोना या जागतिक महामारीला सामोरे जावे लागत आहे. या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत अनेकवेळा लॉकडाऊन लावण्यात आला. या कोरोनाने अर्थव्यवस्था डबघाईला आली. अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. पहिली लाट, दुसरी लाट आणि तिसरी लाट भारतात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लातूरला मोठा फटका बसला. अनेकांना या लाटेत आपला जीव गमवावा लागला तर अनेकजण अक्षरशः पोरके झाले. 2022 वर्षात कोरोना परिस्थिती पूर्णपणे निवळल्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले. हळूहळू सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्याने कोरोना हद्दपार झाला असे वाटले. मात्र, जून महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, मुंबई, पुणे आणि ठाण्यानंतर आता ग्रामीण भागातही कोरोना हळूहळू हातपाय पसरू लागल्याचे आकडेवारी सांगते आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 86 कोरोना रुग्ण आहेत. ही आकडेवारी रविवार दि. 26 जून 2022 रोजी रात्री 7:30 पर्यंतची आहे. मागील चार दिवसात अर्थात गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मिळून तब्बल 61 कोरोना रुग्ण आढळले आहेत. चार दिवसात 61 रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

परीक्षेदरम्यान कोरोना वाढल्यास जबाबदारी कोणाची ?


लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षा सुरू आहेत. परिक्षेदरम्यान कुठल्याही परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने निदर्शनास येत आहे. अशात, कोरोना वाढल्यास आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांतून विचारला जातो आहे. कोरोना वाढत असल्याने विद्यापीठाने परीक्षेच्या आधी संबंधित परीक्षा केंद्र आणि तेथील सर्व स्टाफची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केल्या का ? हे स्पष्ट नाही.

रविवारी एकाच दिवशी 25 रुग्णांची भर


लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात 61 कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. त्यात रविवारी 25 रुग्णांची नव्याने भर झाली आहे. आता कोरोना रुग्णसंख्या ही 86 वर पोहोचली आहे. गेल्या अनेक दिवसानंतर एकाच दिवशी 25 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकूण 86 रुग्णांपैकी 7 रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू असून, उर्वरीत होम आयसोलेशनमध्ये आहेत. लातूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 4.6 टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments