अखेर भादेकर निघाले खराब रस्त्याचे निवेदन देण्यासाठी लातूरला पायी
निवेदनासाठी वापरलेल्या अनोख्या पद्धतीची सर्वत्र चर्चा
बी जी शेख
औसा: दि.24 - खराब रस्त्याचे निवेदन देण्यासाठी भादेकरांनी अनोख्या पद्धतीचा अवलंब करत दिनांक 25 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यासाठी 35 किलोमीटरचा पायी रस्ता चालत जाऊन देणार असल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. औसा तालुक्यातील मौजे भादा येथील अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीचा अवलंब करत निवेदन देण्यासाठी लातूरला पायी जाणार असल्याचे सांगितले. औसा ते भादा हा 13 किलोमीटर चा रस्ता जाण्यासाठी किमान 40 ते 50 मिनिटे लागतात. या रस्त्याचे स्वरूप "रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता" अशी झाली आहे. या रस्त्यावरून अनेक गावांचे दळणवळण आहे. भाजीपाला विकणारे, शेतकरी, दूध विक्रेता, फुल विक्रेता, शहरात जाणारे कामगार, शेतमाल घेऊन जाणारी वाहने, शाळकरी मुले इत्यादींना या खराब रस्त्याचा त्रास होत आहे.
या मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख तसेच औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार व रमेश आप्पा कराड या तीन आमदारांना पायी चालत जाऊन निवेदन देऊन रस्ता नवीन करावा यासंदर्भात मागणी करणार असल्याची माहिती भादा ग्रामपंचायतचे सदस्य अमोल पाटील यांनी दिली आहे. भादा मुरुड रस्त्याबरोबरच वरवडा, शिवली व नेत्यांची खाण असलेली शिंदेवाडी येथील रस्त्याचे निवेदन दिले जाणार आहे. लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या या अनोख्या पद्धतीची चर्चा जिल्ह्यात होत आहे.


0 Comments