Latest News

6/recent/ticker-posts

इंडोनेशियातिल आठव्या शतकातील बौद्ध स्तूप - बोरोबुदूर

दिपक निरंजन निवृत्त वरिष्ठ प्रबंधक(बॅंक ऑफ इंडिया) यांच्या लेखणीतून....

इंडोनेशियातिल आठव्या शतकातील बौद्ध स्तूप - बोरोबुदूर

 

जावा बेटावरील पहाडे व जंगलांनी वेढलेल्या केडू व्हॅलीतील टेकडीवर स्थित बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे व सर्वात सुंदर असे बौद्ध स्तूप आहे. हा स्तूप म्हणजे बौद्ध मान्यतेला कलाशिल्पामध्ये रुपांतरीत केल्याचे एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे. ही केवळ एक कोरीव वास्तू नसून एक उच्च धार्मिक स्थळ देखील आहे व आज इंडोनेशिया या देशाची ओळख आहे. सातव्या ते आठव्या शतकात शैलेंद्र राजवटीत बांधलेल्या ह्या स्तूपाचा पायवा एकशे तेविस मिटर चा आहे व उंची  बेचाळीस मिटर होती परंतु  विजेच्या व ज्वालामुखी च्या माराने ही उंची घटून पस्तीस मिटर झाली आहे. ज्वालामुखीच्या मुखातून निघालेल्या पंचावन हजार स्केअर मिटर ॶॅन्डसाईट खडक व विस लाख दगडी ठोकळ्यांपासून निर्मिलेला स्तूप किती भव्य असू शकतो ह्याची आपण कल्पना करू शकतो. हा स्तूप इतर स्तूपापेक्षा वेगळा असून पायऱ्या असणाऱ्या पिरॅमिड प्रमाणे बांधलेली एक इमारत आहे. हा स्तूप कमलपुष्पाच्या आकारात असून बौद्ध धम्मातील मंडलाचे त्रिमितीय प्रतिरूप आहे. ह्यास दहा मजले असून हे दहा मजले बुद्धत्व प्राप्ती च्या मार्गातील दहा स्थिती दर्शवितात. हे दहा मजले कामधातू, रूपधातू व अरूपधातू ह्या तीन भागात विभागले आहेत.

कामधातू हा पायथ्याचा भाग असून ह्यात मानवी मनावर वाईट आवेगांचे वर्चस्व असल्याचे दाखविले आहे. ही बुद्धत्व प्राप्तीत सर्वात निम्न स्तरावरील अवस्था असून त्याचे प्रमुदिता, विमला व प्रभाकारी हे तिन भाग आहेत. कामधातू च्या वरील चार मजले हे रूपधातू चे असून ह्यात बुद्धत्व प्राप्ती ची मध्यम अवस्था दर्शविली आहे. ह्यात मानव हा वाईट आवेगांवर प्रभुत्व मिळवून आपल्या चांगल्या आवेगाचा वापर करू लागतो परंतु तो अजूनही मानवी आवेगात गुरफटलेला असल्याचे दाखवले आहे. रूपधातू अर्चिष्मती, सुदुरजया, अभिमुखी व दुरंगम ह्या चार भागात विभागले आहे. रूपधातूच्या वरील तीन मजले हे अरूपधातू म्हणून ओळखले जातात. ही बुद्धत्वाची सर्वात उच्च अवस्था असून ह्यात मानवी मन हे सर्व आवेगांपासून मुक्त झाल्याचे दाखवले आहे. ह्याचे देखील अचल, साधुमती व धर्ममेघ हे तिन भाग आहेत.

कामधातू हा स्तूपाचा पाया असून त्यात वरील मजल्यांत जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत. पायऱ्यांच्या सुरवातीला दोन्ही बाजूंनी सिंहाच्या मुर्त्या आहेत. रूपधातू मध्ये पाच चौकोनी बाल्कनी आहेत तर अरूपधातू हे वर्तुळाकार आहे व त्यामध्ये प्रत्येकी चोवीस स्तूपांच्या तिन वर्तुळाकार रांगा असून मध्यस्थानी मुख्य स्तूप आहे. तिबेट मध्ये बौद्धधम्मिय आपल्या पवित्र स्थानाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात त्याला कोरा असे संबोधतात. बोरोबुदूर स्तूप देखील दहाही मजल्यांवर प्रदक्षिणा घालता येतील या प्रमाणे बांधला आहे. ह्या प्रदक्षिणा घालताना दोन्ही बाजूंनी बुद्धाची शिकवन व जातक कथेतील प्रसंग कोरलेले  दिसून येतात. येथे प्रदक्षिणा घालताना बुद्धांच्या जीवनावरील पुस्तकच वाचल्या सारखे वाटते. ह्या प्रदक्षिणा मार्गाची लांबी जवळपास सहा किलोमीटर इतकी आहे. ह्या मार्गावर पंचवीसशे मिटरवर्ग भागात दोन हजार पेक्षा जास्त भित्तिचित्रे कोरलेली आहेत. स्तूपात एकंदर ५०४ बुद्ध मूर्ती अस्तित्वात होत्या. सध्या तेथे फक्त ४७५ मुर्त्या असून त्यातील २४७ भग्नावस्थेत मुख्यतः शिर नसलेल्या अवस्थेत आहेत तर २२८ मुर्त्या पुर्ण पणे शाबूत आहेत. स्तूपातिल २९ मुर्त्या एकतर चोरीला गेल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत. रूपधातूला पाच चौकोनी बाल्कनी असून प्रथम व दुसऱ्या छतावरील बाल्कनीत प्रत्येकी १०४ बुद्ध मुर्त्या आहेत. तिसऱ्या व चौथ्या छतावरील बाल्कनीत अनुक्रमे ८८ व ७२ बुद्ध मुर्त्या आहेत. पाचव्या छतावरील बाल्कनीत ध्यानी बुद्धाच्या ६४ मुर्त्या आहेत. ह्या पाचव्या छतावरील वेगवेगळ्या दिशेला असलेल्या मुर्त्या वेगवेगळ्या मुद्रेतील आहेत. पुर्वेस अकशोभ्य भुमिस्पर्श मुद्रेत, दक्षिणेला रत्नसंभव वरमुद्रेत, पश्चिमेस अमिताभ ध्यानमुद्रेत व उत्तरेस अमोधसिद्धि अभय मुद्रेत आहे.

अरूपधातू हा भाग गोलाकार असून प्रथम मजल्यावर ३२ बुद्ध मुर्त्या, दुसऱ्या मजल्यावर २४ तर तिसऱ्या मजल्यावर १६ बुद्ध मुर्त्या आहेत. ह्या सर्व ७२ मुर्त्या ध्यानी वज्रसत्व बुद्धांच्या धम्मचक्र मुद्रेत आहेत. सर्वात मध्ये वैरोकना बुद्धाची मुर्ती वितरक मुद्रेत आहे. स्तूपाच्या शीर्षस्थानी दहा मिटर व्यासाचा व सात मिटर उंची असलेला मुख्य स्तूप आहे. त्यावरती पुर्वी सर्व स्तूपावर आढळून येते त्या प्रमाणे तिन स्तर असलेली छत्री होती परंतू विज पडल्याने ती नष्ट झाली. बोरोबुदूर ची भव्यता पाहता इतके मोठे बांधकाम एका व्यक्ती च्या आयुष्यात पुर्ण होणें शक्य नाही. बांधकामास कोणी सुरवात केली व कोणी ते पुर्ण केले ह्या बद्दल अजुनही खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. दक्षिण पूर्व आशियन आर्किटेक्चर चे विषेशज्ञ हिरम वुडवर्ड ज्युनियर यांचे मते जावा येथिल बौद्ध भिक्खू बिआन होंग हा आठव्या शतकात तांत्रिक बुद्धिजम चा अभ्यास करण्यासाठी चिन देशात गेला होता. तेथून परतल्यावर त्याने बोरोबुदूर च्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली. स्तूपाच्या पायथ्याशी एक शिलालेख आढळून आला. ह्या शिलालेखाची लिपी ८२४  ए. डी. च्या करांग तेनगाह व ८४२ ए.डी.च्या क्राय काहुलुनान च्या लिपीशि मिळतीजुळती आहे. ह्या शिलालेखानुसार हा स्तूप शैलेंद्र राजवटीच्या समरतुंगा राजाने ७८२ ते ८१२ ए. डी. ह्या काळात बांधला असावा. कालांतराने जावातून बौद्ध धम्म लयाला गेल्यावर हा स्तूप ज्वालामुखी व इतर कारणांमुळे जमिनीत गाडल्या गेला. पुढे अठराशे चवदा साली जावाचा ब्रिटिश लेफ्टनंट गव्हर्नर स्टॅनफर्ड राफेल ह्यास स्थानिक लोकांकडून कळले की जंगलात झाडाझुडपांमध्ये काही कोरीव शिल्प जमिनीत गाडलेले दिसून येतात. त्याने तेथे उत्खनन करून हा स्तूप शोधून काढला. परंतु स्तूप ढासळण्याच्या भितीने पुर्ण उत्खनन झाले नाही. पुढे केडू प्रांताच्या गव्हर्नर ने हे काम १८३५ मध्ये पुर्ण केले. १९७३ ते १९८३ दरम्यान इंडोनेशियाच्या सरकारने युनेस्को सोबत मिळून पुर्ण उत्खनन व स्तूपाच्या पुनर्बांधणी चे काम पुर्ण केले. १९९१ मध्ये युनेस्कोने यास जागतिक वारसा म्हणून घोषित केले. बोरोबुदूर हे एक उच्च दर्जाचे बौद्ध धार्मिक स्थळ असून येथे दरवर्षी बुद्ध पोर्णिमेला  वेसाक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २३ मे १९५३ पासून सरकारी स्तरावर वेसाक साजरा केल्या जावू लागला असून ह्या दिवशी एक हजार दिवे सर्व जगाचे कल्याण होवो ह्या भावनेने आकाशात सोडण्यात येतात.

दिपक निरंजन,मुंबई

Post a Comment

0 Comments