क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
अहमदपूर : येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये ३० डिसेंबर रोजी आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. या विज्ञान महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके होते. मुख्य अतिथी म्हणून दि. एन. टी. सी. सोसायटी, मुंबईचे अध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब गायकवाड, शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रितू मद्देवाड-माले, तसेच उपशिक्षणाधिकारी संजय शिरसागर, जिल्हा संघटक आयुक्त शंकर चामे, गटशिक्षणाधिकारी रामलिंग काळे, विस्तार अधिकारी मधुकर ढमाले, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्तात्रय थेटे, जिल्हा समन्वयक (विज्ञान) शिवलिंग नागापुरे, विज्ञान विभाग प्रमुख राम चामे, केंद्रप्रमुख नामदेव येलगटे, शिक्षक बालाजी शेळके, शाळा समन्वयक व प्रभारी प्राचार्य संगमेश्वर ढगे तसेच अकॅडमी इन्चार्ज उज्ज्वल सोनी आणि श्रीमती अलिसया गोमँगो आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाच्या स्वागताने झाली. मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रितू मद्देवाड-माले यांनी केले. निरीक्षक महेशकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयश आल्यानंतर खचून न जाता नव्या ऊर्जेने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. प्रकल्पांचे निरीक्षण अत्यंत पारदर्शक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी, शिक्षक व पालकांना विज्ञानासोबत संस्कार आणि ज्ञानाची जोड देऊन उज्ज्वल भारत घडविण्याचे आवाहन केले. त्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वही अधोरेखित केले. संजय शिरसागर यांनी विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक वर्गाने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले. त्यांनी ग्रामीण भागात अशा पातळीचे विज्ञान प्रदर्शन प्रभावीपणे पार पडल्याचे विशेषतः नमूद केले. जीवनकुमार मद्देवाड यांनी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि संशोधन वृत्तीला चालना मिळाल्याचे अभिप्रेत व्यक्त केले.


0 Comments