अँटी कोरोना पोलीस(ACP)अभियानाला लातूरकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर: लातूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कल्पकतेतून कोरोना विरुद्धच्या लढाईत कुटुंबातील लहान मुलांना सहभागी होण्याचे आवाहन करीत अँटी कोरोना पोलीस अभियानाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरात एक ACP (अँटी कोरोना पोलीस) असायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी शास्वती या त्यांच्या मुलीची घरातली ACP म्हणून नेमणूक केली आहे.
जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या या नाविन्यपूर्ण अभियानाला लातूरकरांनी तेव्हढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कुटुंबातील लहान मुलांची ACP म्हणून निवड करीत कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभाग घेतला. या अभियानांतर्गत निर्वाचित ACP घरातील सर्व व्यक्तीवर नियंत्रण ठेवतील. सोशल डिस्टनसिंग, मास्क, सॅनिटीयझरचा वापर, बाहेरून आल्यावर स्वच्छ हात धुणे (साबण लावून 20 सेकंद). कारण नसताना कुटूंबातील कुणालाही घराबाहेर पडू न देणे, स्वच्छता पाळणे, कोरोनाविषयी जागरूक ठेवणे अशी महत्वपूर्ण कर्तव्य या लहानशा ACP ना पार पाडायची आहेत.
काल रात्री ACP अभियानाबद्दल माहिती देताच माझा मुलगा आयुष खूपच आनंदित झाला. कालच आम्ही त्याची आमच्या कुटुंबाचा ACP म्हणून नेमणूक केली.आज सकाळपासूनच ACP आयुष आपले कर्तव्य उत्साहात पार पाडत आहे. त्यासाठी त्याने एक नोंदवही देखील ठेवली आहे. घरात येणाऱ्या, जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेणे, मास्क, सॅनिटीयझर, रुमाल याचा वापर करण्याचे आदेश देत आहे.
आयुष सारखी हजारो ACP लातूर जिल्ह्यात कोरोनामुक्तीसाठी सज्ज झाले असून कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला लवकरच यश मिळेल अशी अपेक्षा करू या.
सतिश तांदळे(मुक्त पत्रकार) लातूर
0 Comments