जादा दराने वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना शासनाचा कारवाईचा इशारा
मुंबई:(प्रतिनिधी) राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे असे राज्य शासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला आश्वस्त केले असून टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ, कडधान्य खास करून तूर आणि चनाडाळ, खाद्यतेल, कांदे, बटाटे, साखर, मीठ, मसाले यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा राज्यात तुटवडा नाही,असे स्पष्ट करून स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी राज्यात मुबलक प्रमाणात धान्याचा साठा उपलब्ध आहे, याची ग्वाही शासनाने दिली आहे.भारतीय अन्न महामंडळ किंवा केंद्राच्या गोदामांमध्ये अन्नधान्याची कोणतीही कमतरता नाही. काही किरकोळ दुकानांमध्ये कमी माल उपलब्ध असल्याचे निदर्शनास येऊ शकते. परंतु या दुकानांची साठा करुन ठेवण्याची क्षमताच मुळात कमी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय, लॉकडाऊननंतर या दुकानांमध्ये गर्दी करून ग्राहकांनी वस्तूंची मागणी एकदम मोठ्या प्रमाणात केल्याने साठा संपण्यास सुरुवात झाली. राज्यांतर्गत होणार्या माल वाहतुकीवर आणि पॅकेजिंग उद्योगावर हे क्षेत्र बऱ्यापैकी अवलंबून आहे.असंघटीत क्षेत्रातील किराणा दुकाने ही पुरवठा साखळीची अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. ही दुकाने उघडी असतील याची दक्षता घेण्यात येत आहे. बहुतेक किराणा दुकाने उघडी असतात आणि त्यांच्याकडे अत्यावश्यक वस्तू येण्याला सुरवात झाली आहे. डिटर्जंट आणि साबणाच्या पुरवठ्याबाबत राज्यात कोठेही मोठा तुटवडा नाही. या क्षेत्राशी संबंधित सर्व संघटनांच्या संपर्कात प्रशासन यंत्रणा आहे आणि पुरवठा साखळी सुधारण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत.औषधे, लहान मुलांचे खाद्य, इन्सुलिन आदींच्या पुरवठ्याबाबत कोठेही मोठा तुटवडा नाही. औषध दुकानदार संघटना संबंधित शासकीय विभागाच्या संपर्कात सातत्याने आहे. औषध दुकानदारांना होणारा पुरवठा सातत्यपूर्ण कसा राहील त्याचबरोबर औषध निर्मिती क्षेत्रातील सर्व घटक आपल्या मालाची निर्मिती कशी सुरु ठेवतील याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसातच थोड्या प्रमाणात का असेना ही निर्मिती सुरु होईल हे निश्चित आहे.
अत्यावश्यक खाद्य वस्तूंची आणि औषधांची कोणतीही चणचण राज्यात नाही याचा पुनरुच्चार करून प्रसिध्दी पत्रकात अधोरेखित केले आहे की, एखाद्या जिल्ह्यात किंवा शहरातल्या काही भागात काही वस्तूंबाबत स्थानिक पातळीवर प्रश्न निर्माण झालेला असू शकतो परंतु राज्यातील सर्वसाधारण पुरवठा साखळी समाधानकारक कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे व वस्तूंचा साठा करण्याचे कोणतेच कारण नाही. टंचाईचे कारण देऊन किमती वाढवण्यात येऊ नये असा स्पष्ट इशारा या पत्रकान्वये शासनाने दिला आहे.
0 Comments