Latest News

6/recent/ticker-posts

लेख---> डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील "मी"


        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील "मी"


"शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो ते पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही." अशी डरकाळी १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेल्या भिमराव रामजी आंबेडकर या वाघाने फोडून स्व अनुभवातून तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहून भविष्याचा वेध घेत भावी पिढीला कानमंत्र दिला होता. त्याचा प्रत्यय आज भारताचा भौतिक विकास, राजकीय आणि सामाजिक स्थिती वरुन येत आहे. कारण हे त्यांच्या लेखनीतून उतरलेल्या संविधानाच्या नियमांचे परिणाम आहेत. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधूता हे ब्रीद बाबासाहेबांचे होते. त्यांच्या स्वप्नातील भारत या ब्रीदाप्रमाणे घडायला हवा होता. परंतु तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती यांचा विचार केला तर जगात आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या २० देशांच्या रांगेत भारताचा क्रमांक लागतो. परंतु मानवी विकास घडविणाऱ्या १२० देशाच्या यादीत आपल्या देशाचा कोठेही क्रमांक लागत नाही. हे विशेष..!
     मानवी प्रगतीला अधोगतीकडे नेण्यामध्ये जाती व्यवस्था ही प्रमुख कारण असून शिक्षण हा त्यावरील उत्तम पर्याय असल्यामुळे बाबासाहेबांनी सर्वात जास्त महत्त्व शिक्षणाला दिली होते. म्हणूनच ते म्हणायचे "शिका, संघटीत व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा." अप्रत्यक्ष शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष शिक्षणाचा जन्म होतो आणि दोन्ही शिक्षणातून प्रथम माणूस घडतो तर त्याच क्षणी समाजही घडत असतो. त्याचे साक्ष देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरच आहेत. कारण दिवसातील २४ तासापैकी १८ ते २० तास अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांना तत्कालीन समाज व्यवस्थेची मिळालेली वागणूक आणि भौतिक सुविधा तसेच आजचा समाज आणि आजच्या भौतिक सुविधा यांचा जर मेळ घातला तर बाबासाहेबांचाच काळ खुप चांगला होता असे म्हणावे लागेल. त्याचे कारण असे की, त्या काळात समाज व्यवस्था, चालीरीती, रुढी परंपरा, ही एक मोठी अडचण असली तरी भौतिक सुविधांचा अभाव होता. त्याचे उदाहरण बाबासाहेबांना अभ्यासासाठी दिवस पुरत नव्हता म्हणून ते रात्री वारा, थंडीची तमा न करता रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागत असे. आपले शिक्षण पूर्ण करुन बँरीस्टर ही पदवी घेऊन मायदेशी परतल्यावर त्यांनी "विद्यार्थ्यांनो जागृत व्हा" असा नारा दिला कारण समाज परिवर्तन घडवून आणण्याची आणि नवक्रांती घडविण्याची ताकत केवळ विद्यार्थ्यांमध्येच आहे असा दृढ विश्वास त्यांना होता.
      पण टेबल लँप पासून मोबाईल, संगणकाच्या इंटरनेटची निर्मिती, प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन सुध्दा, खेडोपाडी घराघरात वीज पुरवठा होत असूनही, गावोगावी सिमेंट आणि डांबराची रस्ते झाली. शिक्षण संस्था बरोबर शिक्षणाधिकारी व शिक्षणाचे अधिकार पोहचले, विविध धार्मिक, राजकीय, सामाजिक शैक्षणिक संघटना अस्तित्वात आल्या. परंतु तरीही माणूस घडवणारे शिक्षण आजही या देशात दिले जात नाही का ? असा प्रश्न पडतोच. त्यामुळे समाज घडविणारा माणूस या शिक्षणातून निर्माण होताना दिसत नाही. जाती व्यवस्था, प्रस्थापित समाज, आणि वर्ण पध्दती आजही कायम ठेवली आहे. याचाच अर्थ असा की, आम्ही केवळ कापड बदलले आहेत. आमचा साबन आणि क्रिम पावडरने चेहऱ्यावरचा रंग बदलला असला तरी, त्या कपड्यातील व्यक्ती मात्र त्याच म्हणजे ६५-७० वर्षापूर्वी ज्या होत्या त्याच आहेत. जर हे सत्य आहे तर आम्ही बाबासाहेबांचे स्वप्न धुळीस मिळवले आहे आणि जर ते सत्य नाही तर मग किमान एक तरी महापुरुष बाबासाहेबांचा अनुयायी आज या देशात अस्तित्वात राहिला असता.
     प्रस्थापित समाज पध्दतीला बाबासाहेबांचा विरोध होता. त्यांच्या जीवनात गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले यासारख्या थोर बहुजन समाजवादी विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे या देशाला स्थैर्य आणि शांतता बहुजन वादीच देऊ शकतात हे त्यांना वाटत होते. त्यामुळे शिक्षण हे एक प्रभावी व धारदार शस्त्र आहे असे त्यांनी स्वतः च्या अनुभवातून जानले होते.
     कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मांचा अभ्यास केला. कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार केला नाही तर अभ्यासाअंती स्वतः ज्या हिंदू धर्मात जन्मले होते त्या धर्माचा २१ वर्षानंतर त्याग केला. १९३५ ला येवल्याला धर्मांतराची घोषणा केली आणि १९५६ ला नागपुरात बौद्ध धर्माचा स्वीकार केला. माणूस म्हणून जगायचे असेल तर विज्ञानाचा स्विकार करावा लागेल कारण कर्मकांडात गुलामगीरी शिवाय दुसरे काहीच नाही असे त्यांनी सिध्द केले आहे. जर शिक्षण सोडून व्यवस्थेप्रमाणे बाबासाहेब राहिले असते तर स्वतंत्र भारत कसा राहिला असता याची कल्पनाही करवत नाही. पण मोठ्या कष्टातून, अनेक बलिदानातून व त्यागातून उभा केलेल्या देशात विविधतेतून एकता साधण्याची किमया त्यांनी केवळ आणि केवळ शिक्षणाच्या जोरावर करुन दाखवली आहे. 
 परंतू आज म्हणजे एकविसाव्या शतकात २०१९-२०२० ची परिस्थिती पाहिली तर शिक्षण पध्दती आणि शिक्षण व्यवस्था, भ्रष्टाचार, विविध संघटनेने जनतेचे केलेले वर्गीकरण, धार्मिक जोखडांचा आवळत चाललेला फास, पांढरपेशी जाती व्यवस्था, कुपोषण या सारख्या समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच चालल्या आहेत. बहुजन समाजाने जाती व्यवस्थेची परिसीमा ओलांडून ज्यांचा आदर्श घेऊन एक संघ समाजाचे भवितव्य घडवायचे होते त्या महापुरुषांना जाती व्यवस्थेतच विभागून संकुचित केले आहे. त्यामुळे स्वार्थी व परावलंबी राजकारण्यांनी त्याचा फायदा घेत देशाचे भवितव्यच नाही तर अस्तित्वच धोक्यात आणले आहे.
     कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नात मी होतो. सुशिक्षित, अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढणारा, शिक्षणाचे महत्त्व सांगणारा, विश्वबंधुत्व जपणारा, माणसापासून समाज आणि घरापासून देशाचे अखंडत्व जपणारा त्यांचा अनुयायी होतो. पण माझ्या तन आणि मनावर औपचारिकतेची धूळ साचलेली आहे. साक्षरतेचा चष्मा डोळ्यावर चढवला आहे. लोकशाहीच्या नावाखाली स्वैराचाराने थैमान घातले आहे. हुंडाबळी आणि स्त्री भ्रूण हत्या करून समाजाचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. खून, दरोडे,        बलात्कार, विनयभंग, छेडछाड यांचा कहर झाला आहे. ''स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी होय.'' ही जबाबदारी पेलण्यास मी असमर्थ ठरलोय. म्हणूनच की काय डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामधले 'अधिकार' व 'कर्तव्य' मी विसरलो आहे. म्हणून असा स्वैराचारी झालो असून माझ्यातला माणूस हरवला आहे. माणूस माणसाकडे माणूस म्हणून पाहत नाही. म्हणून हे विघातक कृत्य घडत आहेत. आज समाज शिक्षकांची गरज आहे. पण औपचारिकतेच्या शिक्षणामुळे विद्यार्थी घडत नसल्यामुळे समाज घडण्याचा प्रश्नच येत नाही. पण मी चोरांच्या टोळीत साधू शोधत आहे संकरित निकषावर भरघोस उत्पादन आणि अमाप उत्पन्नाची खान शोधली आहे. त्यामुळे 'वनस्पती कलम' पद्धती अवगत असल्यामुळे कडूलिंबालाही हापूस आंबे लगडत आहेत. पण त्याच्या दर्जा आणि सकसतेच काय ? याचा विचारच आम्ही करीत नाहीत. ओघात पेरलं तेच उगवेल हे विसरलो आहे. म्हणूनच तर त्यांचा पाईक असल्याचे सांगतो आहे.
      भर चौकात विनयभंग, धावत्या वाहनात बलात्कार हे माझी फॅशन आहे. लुटमार, दादागिरी ही माझी हॉबी आहे. भ्रष्टाचार माझा व्यवसाय आहे. त्यासाठी राजकारण माझी जमीन आहे. देश वासी माझे भांडवल आहेत. म्हणून तर ' तु उपाशी आणि मी तुपाशी खातो आहे.' खरंच मी बाबांचा अनुयायी आणि पायिक आहे का? त्यांच्या स्वप्नातील मी असाच होतो का? मला त्यांनी स्वप्नात काय म्हणून पाहिले होते? त्यांचे विचार आणि आदर्श एवढे कमजोर आहेत का? की अल्पशा काळात माझ्यात एवढा बदल का झाला? खैरलांजी डोळ्यांनी पाहिली, दिल्ली अनुभवली, आसामची वार्ता ऐकली तेव्हा मी माझ्या व्यवसायात गुंतलो होतो. त्यामुळेच पुढे कोपर्डी घडली, हैद्राबाद घडले अन् हिंगणघाटने डोळ्यात अश्रू ऐवजी अंजन घातले तरीही तिकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. कारण मी माणसाच्या समाजात आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या कायद्याच्या देशात राहत असल्याचे व तीच वेळ उद्या माझ्यावर येणार आहे. हे 'मी' विसरलो आहे.


महामानव विश्ववंध्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
मानाचा जयभीम !


शब्दांकन:
         - उध्दव किशाबाई बाबुराव दुवे
       आंबेवाडी ता. चाकुर, जि. लातूर
          मो.नं. ९१५८४ ०९९५०


Post a Comment

0 Comments