डॉ.गणेश कदम यांनी कॉग्रेस पक्षाच्या पदअधिकारी यांच्या सह किशोर कदम यांची बोरगांव मध्ये भेट घेतली
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे.या अनपेक्षित स्थगितीमुळे मराठा समाजाला धक्का बसला आहे.आरक्षणाच्या भरोशावर शिक्षण घेत असलेले,स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले हजारो तरुण निराश झाले आहेत.या नैराशातुन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेला एक उच्च शिक्षित तरुण किशोर कदम याने टोकाचे पाऊल उचलत चाकूर तहसील कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्याला वेळीच उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला.आज त्याला रुग्णालयातुन सुट्टी दिल्या नंतर बोरगाव ता.चाकूर येथे अहमदपुर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.गणेश कदम यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळासह कदम कुटुंबीयांची भेट घेतली.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमितभैय्या विलासराव देशमुख यांनी किशोरशी दुरध्वनीवर संवाद साधला आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे.या निर्णयाविरोधात सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून राज्य शासन न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल.तसेच अध्यादेश काढण्याच्या पर्यायावरही विचार चालु आहे. आरक्षणाची ही लढाई सर्वांनी मिळून लढू आणि जिंकु.मराठा समाजातील तरुणांनी सयम ठेवावा आणि आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलु नये,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.यावेळी युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख,युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हंसराज सोमवंशी,युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल शेळके,नायगावचे सरपंच रमेश मोगले,बाळासाहेब भोसले यांच्या सह किशोर कदम यांचे कुटुंबीय आणि गावकरी उपस्थित होते.
0 Comments