हैदराबाद मुक्ती संग्रामात लातुर जिल्ह्याचे योगदान
"मराठवाडा मुक्तीसाठी
जीवन त्यांनी समर्पिले
दास्य शृंखला तोडुन त्यांनी
मातृभुमीला मुक्त केले
कार्याची या महती जाणुन
आठवण त्यांची राहु द्या"
भारताचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे एक महायज्ञ होता.या घटनेला जवळ जवळ ७३ वर्ष होऊन गेली.आजही त्या आठवणी काढल्या की, रोमांच उभे राहतात.१५आगस्ट १९४७रोजी इंग्रज भारतातून चालते झाले.पण मागे तेवढेच शिरजोर राजे,रजवाडे उभे होते.यातील सर्वात उन्मत ,क्रुर, जुलमी,व कारस्थानी होता तो हैद्राबादचा निजाम तो स्वत:ला सार्वभौम समजत असे, आणि इंग्रजांच्या गमनानंतर आपले स्वातंत्र्य सार्वभौम राष्ट्र"आझाद हैद्राबाद" कायम ठेवण्याची उंच महत्त्वाकांक्षा बाळगून होता.आपणास सर्वाच्या सवयीच्या असलेल्या भारताच्या नकाशावर एक ओझरती नजर टाकली तरी लक्षात येईल, निजामाचा डाव तडीस गेला असता तर काय झाले असते? आजचा भारत आस्तित्वात येऊच शकला नसता.
आज तीन राज्यांत नांदत असलेली मराठी,कानडी, तेलगु,भाषीक जनता या संस्थांनात गुलामीचे जीने जगत होती ८२३१३ चौ.मैलांचा हा टापु होता .त्यात आपले साडेसत्तावीस हजार चौ.मैलाचा मराठवाडा होता.ज्याप्रमाणे उर्वरित भारतातील जनतेने स्वातंत्र्यासाठी महान संघर्ष केला . त्याप्रमाणे येथील जनतेने राजेशाही उलथून टाकण्यासाठी प्राणांची बाजी लावली एका अर्थाने मराठवाड्यातील व संस्थांना तील लढा जास्त बिकट,उग्र व स्वातंत्र्यकांक्षी जनतेची कसोटी पहानारा होता. कारण येथे सतर्कतेचा प्रतिपक्ष जास्त मस्तवाल, सरंजामशाही, मनोवृत्तीचा जास्त कुटील होता आणि त्याला फसिष्ट वृत्तीचीअतिक्रुर अशी भुतावळं उभी करायला कचर वाटली नव्हती .कै नरहर कुरुंदकरांनी एका ठिकाणी असे दाखवून दिले होते की, संपूर्ण भारतातील स्वातंत्र्यवीरांचे संख्खाप्रमाण व मराठवाडयातील स्वातंत्र्यवीरांचे संख्खाप्रमाण त्याची तुलना केली असता येथील जनतेला फार मोठा त्याग करावा लागल्याचे दिसून येते.त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही भागापेक्षा मराठवाडयात हुतात्म्यांची संख्या जास्त राहीली.
शेवटच्या टप्यानंतर जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद व्हावी असे सशस्त्र लढे,कम्पस उभे राहिले. वीस एकवीस हजार स्वातंत्र्य सैनिक बंदुका घेऊन लढले भारत सरकारला हस्तक्षेप करावा लागला १३ सप्टेंबर १९४८ रोजी जनरल जे.एन.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य संस्थानात घुसले १७ सप्टेंबर रोजी ही "आप्रेशन पोलो"नावाची मोहीम पुर्ण झाली निजामाने शरणागती पत्करली अनेक शतकांची गुलामगिरी संपली स्वातंत्र्यांची पहाट फुटली त्या चैतन्यमय क्षणाचा सुवर्ण महोत्सव आज आपण साजरा करीत आहोत .हैद्राबाद मुक्ती संग्रामात अनेक विरांनी आपले हुतात्म पत्करले त्यापैकी कोणत्या स्वातंत्र्यविरांचे नाव घ्यावे.? हा खरा प्रश्न आहे कै. अनंत भालेराव यांच्या पुस्तकात मराठा,ब्राम्हण,माळी,सुतार,सोनार,लोहार,होलार, न्हावी,कुंभार,मारवाडी,मुस्लिम,लमाणी,राजपुत, महार,मांग,कोमटी या जातीतील विरांची नावे वाचायला मिळतात.
या लढ्यात लातुर जिल्ह्याचे योगदान विसरता येणे शक्यच नाही मग ते अतिशय धाडसाने लातुरचा ऐतिहासिक गंजगोलाई वर फडकणारा निजामाचा 'असफजाई'झेंड काढुन फेकुन तिथे तिरंगा फडकाविण्याची शौर्य गाथा असो की, हाडोळीच्या मोहनराव पाटलांनी आपल्या दोनसे जवानसह सशस्त्र मिरवणूक काढुन व त्या खेड्यावर हल्ला करुन एका हिंदू स्त्रीस रजाकारांनी पळवुन नेले त्यांची खांडोळी करण्याचा प्रसंग असो की,गंगापुरच्या ज्ञानोबा गाडेकरांनी रात्रभर सहकार्यासह लढलेली दारफळची लढाई असो,अथवा चिंचोली कंम्पवर चैतन्याचे वारे सळसळते ठेवनारे लातुरचे चंद्रशेखर दादा वाजपेयी असो की,जेलरच्या डोक्यात जळते लाकुड घालून सुरुंग फोडुन सुटका करुन घेणारे देवीसिंग चौहान गुरूजी व श्रीनीवास अहंकारी अशी किंवा उदगीरच्या किसान दलाची शौर्य गाथा असो सर्व शुर विर याच मातीतले स्वातंत्र्य सेनानिच आहेत.
प्रत्येक प्रसंग हा अंगावर रोमांच उभा करणारा आणि या लढ्यासाठी लढनाऱ्या डोक्याला कफन बांधुन घराबाहेर पडलेल्या विरांची कहानी सांगणारा असाच आहे.
या स्वातंत्र्या लढ्यात तरुनांचीही कामगिरी मोलाची होती ते आजही प्रसिद्धीस आले नाहीत लातुरच्या गंजगोलाईत तिरंगा फडकावण्याचा रोम हर्षक क्षण आजही या क्षणाचे साक्षीदार असलेले करबस अप्पा इंडे ,शामराव किल्लारीकर सांगतात "तेव्हा पटते की,स्वाभिमान डिवचल्यानंतर माणसे प्राणांची पर्वा न करता कोणतेही कार्य करण्यासाठी तयार असतात ,अन्यथा केवळ काशीम रझवीच्या वाक्यावर लातुरच्या रघुवीर शिंदे सारखे तरुण गंजगोलाई वर बापुजींचा तिरंगा फडकावण्यासाठी इतके पेटुन उठले नसते याच गोलाईवर निजामाच्या वाढदिवसाला भाषण करताना कासिम रझवी मग्रुरपणे म्हणाला होता,"चुहे बिलसे बाहर निकल रहे है उन्हे कुछल डालो" ही उध्दट चेतावणी मनात ठेऊन किल्लारीचा तरना बांड रघुवीर शिंदे कमालीचा चिडला मग्रुर रझवीला खरे उत्तर त्याचा असफजाई झेंडा खाली खेचुनच देऊअसा निर्धार त्यांनी केला लगोलग बार्शिला जाऊन महादेव अप्पा सुपेकर यांच्या कडुन त्यांनी तिरंगा आणला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तो गोलाईत आला . त्यावेळी गोलाईत ५० ते ६० फुट उंचीचा चिरेबंद टावर होता व त्यावर निजामशाही झेंडा फडकत असे रघुवीर शिंदे त्या टावरवर घोरपडीसारखा सरसर चढला त्याने निजामाचा असफजाई झेंडा खाली फेकुन दिला त्याजागी रघुविरने तिरंगा फडकावला पहाट होताच संपूर्ण गाव हे दृश्य पाहण्यासाठी टावर भोवती जमा झाले .लातुरकरांना घडलेले तिरंग्याचे हे पहिले दर्शन होते. म्हणुन प्रसिद्ध कवी लक्ष्मीकांत तांबोळी म्हणतात,
"या मातीतल्या पुण्याईचा
टिळा कपाळी लावु
जोवर वाहे गोदामांई
तोवर गाणे गाऊ
मराठवाडी मानदंड हा
अखंड फडकत ठेऊ "
प्रा.वैजनाथ सुरनर(सदस्य)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन मुंबई
भ्रमणध्वनी: ८८३०१०९२८१
0 Comments