कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात दुप्पटीने वाढ
टोकण पद्धतीचा अवलंब एकरी 17 क्विंटल उत्पादनाची शक्यता
लातूर:{सतीश तांदळे} तालुक्यातील चिखुर्डा या गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली टोकण पद्धतीचा अवलंब करून सोयाबीनची लागवड केली. यावर्षी काढणीच्या दरम्यान झालेल्या पावसातही पिकावर कुठलाच दुष्परिणाम झाला नाही यामुळे शेतकरी आनंदात आहेत.
चिखुर्डा गावातील निजाम शेख, संदीपान घाडगे आणि धनराज कुंभार या शेतकऱ्यांनी १२ एकर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत टोकण पद्धतीने साडेतीन फुटांवर सरी करून नऊ इंच अंतरावर २ बियाणे टोकण केले यासाठी त्यांना १२ किलो बियाणे लागले. दोनदा खुरपणी, कोळपणी आणि योग्यवेळी कीटकनाशकांची फवारणी केल्याने सोयाबीनचे पीक जोमात वाढले. सोयाबीनच्या शेंगांनी लगडलेली पिके पाहून शेतकरी वर्ग सुखावला आहे. एकरी १६ ते १७ क्विंटल उत्पादन होईल अशी अपेक्षा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दरम्यान केली आहे.
जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी महेश क्षीरसागर, मंडळ अधिकारी सचिन बावगे, कृषी पर्यवेक्षक राजकुमार चव्हाण आणि कृषी सहायक संगीता विश्वकर्मा यांनी वेळोवेळी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
0 Comments