Latest News

6/recent/ticker-posts

पत्रकाराच्या वाहनावर दगडफेक;लुटमारीचा प्रयत्न असफल, लातुरातील धक्कादायक प्रकार

पत्रकाराच्या वाहनावर दगडफेक;लुटमारीचा प्रयत्न असफल, लातुरातील धक्कादायक प्रकार 

सतीश तांदळे

लातूर शहरालगत असलेल्या हसेगाव येथील सेवालयात आज होत असलेल्या विवाहसोहळ्याचे वार्तांकन करून परत लातूरला येत असलेले TV9 मराठी या वृत्तवाहिणीचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र जोंधळे यांच्या वाहनावर 5 अज्ञात हल्लेखोरांनी रात्री 10.30 च्या सुमारास दगडफेक करून वाहनाची तोडफोड करत पैशाची मागणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत पत्रकार सचिन सोळुंके हे देखील गाडीत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून महेंद्र यांनी खाली न उतरता गाडी तशीच पुढं नेली आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत घडलेल्या भीषण हल्ल्याची माहिती दिली. 

थोड्याच वेळात पोलिसांसह महेंद्र यांनी घटनास्थळ गाठले त्याठिकाणी एका आरोपीचा मोबाईल फोन, वाहनाचे तुटलेले वायफर आढळून आले. त्याआधारे पोलीसांना आरोपींची ओळख पटली असून हे सर्व हल्लेखोर हसेगाव तांड्यावरील असल्याचे सांगितले आहे. रात्री उशिरा 4 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच हे सर्वजण ताब्यात घेतले जातील अशी माहिती पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिली आहे.

लातूर शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर आणि रात्री 10.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने आता पोलिस प्रशासनासमोर नवीन आव्हान उभे केले आहे. आपला पत्रकारितेतील अनुभव आणि समयसूचकता या बळावर महेंद्र जोंधळे यांनी प्रसंगावधान दाखवून आपली सुटका करून घेतली मात्र राज्यात शांत आणि सुरक्षित जिल्हा म्हणून आपली ओळख असलेला हा जिल्हा या घटनेने हादरला आहे.

पोलीस प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करून घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments