Latest News

6/recent/ticker-posts

अवकाळी पाऊस! हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उडाली धावपळ

अवकाळी पाऊस! हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उडाली धावपळ 


लातूर(जिल्हा प्रतिनिधी/बी डी उबाळे)दि. 20 - मार्चपासून वादळी वाऱ्यासह अवकाळ पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात रब्बीचा हंगाम सुरू असून रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, करडी, जवस, सूर्यफूल काढणीचा हंगाम सुरू असून अनेक शेतकर्‍यांनी शेतातील उभ्या पिकांची कापणी करून ढिगारे घातले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रब्बीची पिके शेतात उभी आहेत. त्यातच हवामान खात्याने 20 मार्चपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार व वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी रब्बी पिकांची नासाडी होण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे. तसेच द्राक्ष, डाळिंब, संत्री, मोसंबीच्या बागांना बहार आला आहे. आंब्यालाही यावर्षी चांगला मोहोर येऊन गावरान व सुधारित जातीच्या आंब्यांची नासाडी होण्याची शेतकरी वर्गात भीती व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या कृपेने फळबाग, भाजीपाला व रब्बी पिके चांगली आलेली असताना आता वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होण्याची चिंता शेतकरी वर्गात भेडसावत आहे. निसर्ग देतो आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडीही करतो. निसर्गाचा विचित्र खेळ कधीही, कुणालाही कळाला नाही. औसा तालुक्यात सुमारे 40 हजार  हेक्टर्स क्षेत्रावर यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने हरभऱ्याची पेरणी झाली आहे. तसेच गहू, ज्वारी, करडई इत्यादी इतर पिके जवळपास 30 ते 35 हजार हेक्टर्स क्षेत्रावर असल्याने अनेक शेतकऱ्यांची रब्बीची पिकांची कापणी , मळणी इत्यादी कामे खोळंबलेली आहेत. तसेच वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे तर नुकसान होणार आहेच. त्याचबरोबर मुक्या प्राण्यांचा चारा, कडबा पावसात काळा पडून नष्ट होण्याची भीती असल्याने अवकाळी पावसाच्या भीतीने बळीराजाची धावपळ उडाली असून शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे.

Post a Comment

0 Comments