औसा तालुक्यातील खानापूर शिवारात ऊस जळून लाखोचे नुकसान
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा तालुक्यातील खानापूर शिवारातील शेतकऱ्याचा ४ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की ,मंगेश प्रदीप अंबुरे व प्रमोद राम कृष्ण अंबुरेे यांच्या खानापूर येथील सर्वे नंबर 46 मधील शेतात उसाचे पीक जोमात आले होते. शनिवार दि 3 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3 च्या सुमारास शेतकऱ्याच्या ऊसाला शॉर्टसर्किटने अचानक आग लागून या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला असून या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.एकीकडे संपूर्ण मानवजातीवरच कोरोना विषाणूंचे संकटाने अडचणीत आलेला शेतीव्यवसाय आणि नैसर्गिक संकटामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यामुळे त्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे .या घटनेची माहिती मिळताच तलाठी बी.आर. माने यांनी घटनास्थळी जाऊन जळालेल्या उसाचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालय औसा येथे दिला आहे. सर्वे नंबर 46 मधील एक हेक्टर 81 आर जमिनीतील चार एकर ऊस जळाल्याने मंगेश प्रदीप अंबुरे व प्रमोद रामकृष्ण अंबुरे या शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. थोड्याच दिवसात साखर कारखान्यामार्फत उसाची तोड होणार होती, परंतु शनिवारी शॉर्टसर्किटमुळे उभा ऊस जळाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे .मंगेश आंबुरे व प्रदीप प्रमोद अंबुरे यांनी सुधारित जातीच्या उसाची लागवड करून उसाचे पीक चांगले जोमात आणले होते परंतु अचानक कष्टाने पिकवलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.यामुळे शासनाने अशा नैसर्गिक आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून उभारी आणि आधार देणे आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

0 Comments