Latest News

6/recent/ticker-posts

नियमांची सक्ती करणार्‍यांंनी औशात बसविले कोरोना नियम धाब्यावर

नियमांची सक्ती करणार्‍यांंनी औशात बसविले कोरोना नियम धाब्यावर




सेवानिवृत्त  पोलिस अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात  कोरोना नियमाचा फज्जा 

 शेख बी जी

औसा: कोव्हिड-१९ प्रतिबंधक कायद्याचा बडगा सर्वसामान्य जनतेला दाखवून दंडात्मक कारवाई करणा-या पोलिसांकडून आपल्या साहेबांच्या निवृत्तीनिमित्य आयोजित कार्यक्रमात  करोना प्रतिबंधक नियमाचा पार फज्जा उडवित   लाभार्थ्यानी साहेबांप्रति प्रेम व्यक्त केले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासनासह प्रशासन लोकांनी गर्दी करु नये यासाठी कडक नियम लागू करीत असतांना औशात मात्र खुद्द पोलिसच या नियमांना बगल देत  असल्याचे चित्र औशात समोर  आले आहे. बुधवार दि. ३१मार्च   रोजी येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभ प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात घेण्यात आला. या निरोप कार्यक्रमाला जवळपास शंभरपेक्षा अधिक लोकांनी गर्दी केली होती. शासन एकीकडे सार्वजनीक, सांस्कृतीक व खाजगी कार्यक्रमांना बंदी घालत असतांना औशाच्या पोलिसांनी केलेला हा निरोप समारंभ आता चर्चेचा विषय बनला आहे. गोर गरीबाला नियमावर बोट ठेऊन काठ्या घालनाऱ्या पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवत हा जंगी कार्यक्रम साजरा केला याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. औसा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  सेवानिवृत्त झाल्याने त्यांना औसा पोलिस ठाण्यातर्फे निरोप देण्यात आला. सध्या औसा तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांने कळस गाठला आहे. रुग्णांचा वाढता आकडा गोठविण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या बरोबरच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील   आहे. गर्दी बाबत प्रशासनाने कडक निर्बंध लागु केलेले असतांना बुधवारी येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात खचाखच लोक भरवून या  पोलिस अधिका-यांचा निरोप समारंभ करण्यात आला. सर्वसामान्यांना कोरोनाचे नियम दाखवित लाठ्या काठ्या घालणाऱ्या पोलिस प्रशासनानेच असा गर्दीचा कार्यक्रम करुन कोरोनाला एक प्रकारे आमंत्रण देत शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखविली. या कार्यक्रमात अनेकांच्या तोंडाला मास्क सुध्दा नव्हता.  साहेबांच्या कार्यकाळात अवैध लाभ झालेले अनेक लाभार्थ्यांची मोठी गर्दी, व  उपस्थिती डोळ्यात भरणारी होती. फक्त मोजक्यात मंडळीच्या उपस्थित पोलिस कर्मचारी निरोप देणार होते .परंतू काही अतिउत्साही कर्मचाऱ्यांनी साहेबांप्रति आपले अतिप्रेम दाखविण्यासाठी अवैध लाभार्थ्याना निरोप दिला. आणि पोलिस कर्मचारी कमी आणि अवैध लाभार्थी जास्त अशी स्थिती प्रशासकीय  इमारत सभागृहात झाली असल्याचे बोलले जात आहे. या  निरोप समारंभास औशाच्या तहसीलदार शोभा पुजारी, औसा उपविभागीय पोलिस अधिकारी नवले हे उपस्थित राहणार असल्याचे बॕनर कार्यक्रमस्थळी होते. परंतू हे दोन्ही अधिकारी या समारंभाला उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी दिली होती की नाही असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान  या तथाकथित  निरोप समारंभाबाबत  धर्मराज पवार आणि अनिल कोळी यांनी तहसीलदारांना एक निवेदन देत कोरोना काळात गर्दीचा मज्जाव असतांना राजकीय पक्षांनी केलेले आंदोलन आणि पोलिस निरिक्षकांच्या निरोप समारंभाला जमा केलेली गर्दी ही आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणारी असल्याने या कार्यक्रमात सहभागी असलेल्या व कार्यक्रमाचे आयोजन करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे औसा तालुका विकास आघाडीच्यावतीने तहसीलदार औसा यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments