"आई खायला देईना व बाप भीक मागू देईना" असंघटित कामगारांवर उपासमारीची वेळ
शेख बी जी
दि.१७ - लॉकडाऊन ची प्रक्रिया वरवर वाढत असल्याने असंघटित कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. यांना मिळणारा रोजगार बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही असंघटित कामगारांचा विचार करून त्यांना 1500 रुपये अनामत रक्कम घोषित केली खरे. मात्र ज्यांना ही रक्कम मिळाली नाही असे भरपूर असंघटित कामगार आहेत. यामध्ये डीएड, बीएड या व्यवसायिक अभ्यासक्रमावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आजही अनेक संस्था चालकांनी पगारी दिल्या नाहीत. "काम नाही तर वेतन नाही." या धोरणावर अनेक संस्था काम करत आहेत. याच पद्धतीने अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हीच अवस्था आहे. एक वर्ष सहा महिने पासुन मदरशांमध्ये अध्यापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही अवस्था दयनीय आहे. एमआयडीसी क्षेत्रातील 50% कर्मचाऱ्यांनी कामाच्या धोरणामुळे अनेक कंपन्यांनी आपली उत्पादने बंद केली आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न अनुत्तरित आहे. शेतीशी निगडीत असलेल्या व्यवसायावरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. विमा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. असे अनेक क्षेत्रे आहेत ज्या ठिकाणी या लाॅकडाऊनमुळे बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. या लोकांना विद्यमान परिस्थिती मध्ये इतर क्षेत्रात काम करायचे म्हटल्यानंतर कोणी कामाला देखील लावत नाही म्हणजे एकीकडे हाताला काम नाही व काम नसल्याने घरात उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. म्हणजे "बाप भीक मागू देत नाही व आई खायला देत नाही" अशी अवस्था या असंघटित कामगारांची झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यासंबंधी बोलताना एका कर्मचाऱ्याने इशारा प्रतिनिधीशी बोलताना म्हटले की आम्हाला कोणी मिस्तरीच्या हाताखाली देखील कामाला घेत नाहीत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत शासन स्तरावर या लोकांचा विचार करून ताबडतोब यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटवावा अशी मागणी असंघटित कामगार करत आहेत.

0 Comments