चाकुरात दोन ट्रक तांदुळाचे पकडले,बारा लाख रुपये किंमतीचे तांदुळ जप्त
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} येथे पोलिसांनी संशयावरून दोन तांदळाचे ट्रक पकडले. उमरग्याहून गोंदीयाकडे जात असलेल्या दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शनिवारी (दि. २६) दुपारी ट्रक ताब्यात घेतले. यात १२ लाख रुपये किमतीचा ५६ टन तांदूळ असून चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूर नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, यातील दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ अवैध मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिस हवालदार हणमंत आरदवाड, ईश्वर स्वामी, हणमंत मस्के यांनी दोन ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये तांदळ आढळन आला. याबाबत चालकास विचारणा केली असता कर्नाटक राज्यातून तांदूळ गोंदिया येथे घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. ट्रकचे वजन उमरगा चौरस्ता येथे करण्यात आल्याचे दिसून आले. चालक देत असलेली माहिती व कागदपत्र यात तफावत असून तांदूळ स्वस्त धान्य दुकानाला पुरवठा केला जाणार असल्याचा संशय आल्यामुळे पोलिसांनी दोन्ही ट्रक ठाण्यात आणले. ट्रकचे चालक बीरागोंडा ईश्वर हुगुंडा (वय ३०), अहमद अमिर पटेल (वय २५ रा. दोघे वडनखेरा, ता. हुमनाबाद) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठीचे पत्र पोलिसांनी तहसीलदारांना दिल्यावरून पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार बालाजी चितळे यांनी ट्रकमधील तांदळाची पाहणी केली व याचे नमुने घेतले आहेत. दरम्यान, अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी दिली.

0 Comments