हमीद शेख{ पत्रकार } यांच्या लेखणीतून...
लाटांवर लाटा अन् गटांगळ्या खाती व्यवस्था
राज्यात परत एकदा लॉकडाऊनला सुरुवात होत आहे.अनेक ठिकाणी वीकएंड लॉकडाऊन आणि टाईम मर्यादा घालण्यात आली आहे. मार्च 2020 पासून सुरु झालेला लॉकडाऊन पे लॉकडाऊन थांबायला तयार नाही. दीड वर्षाच्या या काळात सरकार आणि प्रशासन नावाची यंत्रणा अकार्यक्षम ठरली आहे, मग प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार सरकारवर खापर फोडायला हरकत नाही. ( केंद्र की राज्य ) कोरोना माहमारीच्या या काळात फक्त कडक लॉकडाउन हाच एकमेव उपाय असल्याचा सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे हे एकवेळ मान्य केलं तरी किती दिवस हेच करायचं ? हे ही ठरवावं लागणार आहे. सोबतच सामान्य जनजीवन व्यवस्थित चालत राहावे यासाठी ही काही वेगळे प्रयत्न करायची गरज आहे. रुग्ण संख्या वाढली कि लावला लॉकडाऊन. जगभरातही हीच परिस्थिती आहे हा आजार आटोक्यात आणण्यासाठी अनेक प्रयोग आजही सुरू आहेत. यासोबतच जगभरातील अनेक देशांनी आर्थिकचक्र व्यवस्थित चालावं यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे पाहायला मिळतं. पण आपलं दुर्दैव आपल्याकडे सगळा कारभार रामभरोसे सुरू दिसत आहे.आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आपण पाहिलेलं आहे.वैद्यकीय क्षेत्राचे अनेक कटू अनुभव अनेकांनी भोगलेत. ऑक्सीजन,बेड, वेंटीलेटरच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.रिमडीसीवेअर,प्लाजमा व इतर औषधांसाठी नातेवाईकांची झालेली दमछाक ही अनुभवली आहे.या काळातील औषधांचा काळाबाजार आणि रुग्णालयातील लुटीचे अनेक साक्षीदार आपल्या अवतीभवती पाहायला मिळतील. प्रशासकीय यंत्रणेकडून झालेल्या भ्रष्टाचाराचा आणि दमनाच्या अनेक कहाण्या आहेत.हे सगळं घडत असताना सरकार म्हणा किंवा तत्सम यंत्रणा म्हणा यातलं काहीही थांबवू शकल्या नाहीत किंबहुना ते सगळं व्हावं अशी त्यांची इच्छा असल्यास निदर्शनास आले आहे. महागाई आकाशाला भेडली आहे. पेट्रोल,डीजल,खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत रेकॉर्डब्रेक वाढ सुरू आहे. लॉकडाउनमुळे सामान्य जनतेचं आर्थिक कंबरडे मोडलं असून अनेकांनी नोकऱ्या गमावल्यात ज्यांच्या टिकल्यात त्यांची अवस्था त्यांनाच ठाऊक. गरीब कसातरी जगतोय श्रीमंत श्रीमंतच होत आहेत त्यांना कशाचं काही देणं घेणं नाही. भरडला जातोय तो मध्यमवर्ग हाच मध्यमवर्ग जो आपल्या आयुष्यात मदमस्त होता आपलं बरं चाललंय ना मग बास म्हणायचा.पण याच मध्यमवर्गाची आज सर्वाधिक वाट लागलीय. अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी सरकार आणि इतर तत्सम यंत्रणा विशेष प्रयत्न करत आहेत अशी परिस्थिती नाही.जीडीपी वगैरे सरकारी आकड्यांवर बोलण्यात अर्थ नाही. दिवसेंदिवस सामान्यांची अवस्था आर्थिकदृष्ट्या हालाकिची होत चालली आहे,वरून लाटांवर लाटा चालूच आहेत.लाट आली कि सगळ्या यंत्रणा खडबडून जागतात अमुक नियम पाळा तमुक नियम पाळाचे जीआर वर जीआर चालू होतात पण त्या दरम्यानच्या काळात आरोग्य व्यवस्थित फार काही बदल होत नाही.ना वेंटीलेटरची संख्या वाढते ना बेडची ना त्या आजारावरील संशोधनाची. दणक्यात लसीकरणाच्या घोषणा होतात पण लसीचा पत्ता नसतो. औषधासाठी लाखो रुपये खर्चावे लागतात,एवढं सगळं करूनही अजून किती लाटा येणार आहेत याचा अंदाज सध्यातरी कुणालाही नाही पण या परिस्थितीत आपण किती दिवस लॉकडाऊन पे लॉकडाऊन करत राहणार याचा विचार करायला हवा.माणसाचा जीव सर्वाधिक महत्वाचा आहे हे मान्यच पण त्यासोबतच जगायला भरपूर काही लागतं आणि ते व्यवस्थित चालावं हे पाहणं ही कल्याणकारी राज्यात सरकारचं काम आहे. त्यात कुठे तुरी चूक होताना दिसतेय.आता तुम्ही म्हणाल नुसतं ज्ञान देऊ नका उपाय सुचवा,यासाठीच तर सरकार आणि प्रशासन नावाची यंत्रणा आहे. अगदी काड्यापेटी पासून मोबाईल रिचार्ज पर्यंत प्रत्येक गोष्टीवर आपण यासाठीच टॅक्स देत असतो की या यंत्रणेने याचा उपयोग करून जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी काम करावं.आणि त्याबदल्यात त्यांना लाखोंच्या पगारी ( चहापाणी अलगसे ) सर्व सुखसोई दिलेल्या असतात.पण दुर्देवाने या यंत्रणा मोजक्यांच्या हिताचं काम करताना दिसतात. विशेषतः कोविड काळात तर हे अधिक प्रकर्षाने जाणवले आहे. त्यामुळे येत्या काळात तरी कोविडच्या या लाटांत लॉकडाउनच्या गटांगळ्या न खाता यंत्रणांनी इतर पर्यायांवर विचार करायला हवा.
हमीद शेख{ पत्रकार }

0 Comments