मृग नक्षत्राच्या पावसाचे शेतकऱ्याकडून औसा तालुक्यात स्वागत
बी डी उबाळे
औसा: मृग नक्षत्राच्या आगमनानंतर तीन दिवस हुलकावणी देऊन काल शनिवार दि 12 जून 2021रोजी औसा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाची सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाकडून पावसाचे स्वागत करण्यात आले. शनिवारी दिवसभर कडक उन्हाची तीव्रता होती परंतु सायंकाळी 5 नंतर ढगाळ वातावरण तयार होऊन ढगांच्या गडगडाटासह औसा शहर आणि तालुक्यात व परिसरात सहा वाजता पावसाचे आगमन झाले यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून आणखीन दोन-तीन पाऊस झाले झाल्यानंतर शेतकरी खरीप पेरणी करू शकतील. औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी पेरणीपूर्व मशागत करून ठेवल्या आहेत.खते, बियाणे यांची जमवाजमव करून आता शेतकरी राजा चाढ्यावर मूठ धरण्याच्या तयारीला लागला आहे. अनेक शेतकऱ्यांना या वर्षी सोयाबीन बियाण्याची समस्या भेडसावत असून आडत बाजारात सात हजारांपेक्षा अधिक भाव प्रतिक्विंटल सोयाबीनला असल्यामुळे बियाण्याचे दरही वाढले. 30 किलोच्या एका जागेसाठी तीन हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे बियाणे वाजवी दरात देण्याची घोषणा केली परंतु महाडीबीटी पोर्टल वर अनुदानित देण्यासाठी अर्ज करून लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या मोजक्या शेतकर्यांना सवलतीचे बियाणे मिळाले आणि शेतकरी महाबीज कंपनीच्या बियाण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर चकरा मारत आहे परंतु महाबीज कंपनीचे बियाणे कृषी कार्यालयाच्या परमिट व्यतिरिक्त इतरांना मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना प्रति भाग 3हजार ते 3हजार200 रुपये मोजावे लागत आहेत. मृग नक्षत्राच्या शनिवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाली आहे एक-दोन वेळा मोठा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांची पेरणी साठी धावपळ सुरू होणार आहे.या वर्षीसुद्धा मृग नक्षत्रात खरीप पेरणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मृगाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी वर्गाने सुटकेचा नि;श्वास सोडला आहे.
0 Comments