"महाराष्ट्र विधानसभेचे विद्यापीठ हरवले"
सोलापूर: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिपस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जायचं आणि तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले ते ९४ वर्षांचे होते. सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपतराव देशमुख यांच्यासमोर राजकारणातील अनेक पिढ्या घडल्या. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांचं काम त्यांनी जवळून पाहिलं. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. या माध्यमातून लोकांना न्याय देता देता त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी काम करण्याची जवळीक झाली. १९५० पासून ते शेकापचे सक्रिय कार्यकर्ते झाले. १९६२ साली गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली. पहिली निवडणूक लढवताना दुष्काळी सांगोल्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी लढाई सुरू केली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण दोन वर्षांतच झालेल्या पोटनिवडणुकीत गणपतराव पुन्हा निवडून आले ते सलग १९९५ पर्यंत. याकाळात १९७७ साली त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभळले होते. एकच शेतकरी कामगार पक्ष, एकच मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि एकच उमेदवार गणपतराव देशमुख महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे. आजोबांपासून नातवाचेही मतदान गणपतराव यांना मिळाले होते. आयुष्यातील ५० वर्ष त्यांनी विधानसभेतील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे काम पाहिली होती. तसंच आपल्या कामाचा ठसा सुद्धा त्यांनी राज्यातील राजकारणात उमटवला होता. आज त्यांच्या जाण्यामुळे विधानसभेचा एक साक्षीदार निखळला अशी भावना व्यक्त होत आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments