एका मोठ्या पावसातच औश्याचा विकास 'चव्हाट्यावर'अनेकांच्या घरात घुसले पाणी, रात्र काढली जागून
शेख बी जी.
औसा: दि.५ - चार सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला. पावसाचा जोर अधिक असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. यामध्ये औसा शहरात अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र दिसून आले. घरात पाणी असल्याने रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरण्याची फोटो प्रसार माध्यमावर आल्यानंतर नगराध्यक्ष शेख यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व शक्य त्या उपाययोजना केल्या. औसा शहरातील मुख्य गटार ज्या ठिकाणाहून गेली आहे तो भाग मोमीन गल्ली त्या ठिकाणची परिस्थिती दयनीय होती.अनेक वेळा येथील सामाजिक कार्यकर्ते खुनमीर मुल्ला यांनी अर्ज दिले की या ठिकाणी येणाऱ्या पाण्याची विल्हेवाट इतरत्र जाण्याची सोय करावी. मात्र पालिकेने या अर्जाला केराची टोपली दाखवत उपाययोजना केल्या नाहीत. याबाबतीत माजी नगरसेविका जयश्रीताई उटगे यांनी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की लोकांची घरे ही खाली आहेत त्यामुळे पाणी घरात पाणी शिरले आहे. आशा या बेजबाबदार वक्तव्यामुळे नागरिकांचा रोष मुख्याधिकारी यांच्यावर ओढावला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार असल्याचे पत्र मिळाले असतानाही मुख्याधिकारी मुख्यालयी राहील्या नसल्याचे बोलले जाते. एकूण परिस्थिती पाहता औश्याचा विकास चव्हाट्यावर आल्याची चर्चा शहरात आहे. प्रत्येक मोठ्या पावसामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी तात्पुरती योजना करण्यापेक्षा कायमस्वरूपी योजना करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.


0 Comments