Latest News

6/recent/ticker-posts

सोयाबीन काढणीसाठी चिखल पाण्यात शेतकऱ्यांची कसरतीची होतेय दैना

सोयाबीन काढणीसाठी चिखल पाण्यात शेतकऱ्यांची कसरतीची होतेय दैना


बी डी उबाळे

औसा: मागील अनेक दिवसापासून औसा तालुका व संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे कहर झाला असून नैसर्गिक संकटाचा सामना करताना शेतकऱ्याला अतिशय दारूण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. सध्या सोयाबीन कापणीचा हंगाम होऊन गेला असून शिल्लक आहे ते सोयाबिंन पदरी पाडून घेणे शेतकऱ्यांकडून सुरू असून 20 सप्टेंबर पासून सलग पावसाची हजेरी असल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके पदरात घेण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत आहे. मागील वीस दिवसांपासून सातत्याने पावसाचे आगमन होत असून शेतकरी गुडघे मिठीला आला आहे.सुरुवातीला 20 ते 25 दिवस पावसाने दडी मारल्याने पिके कशी तरी तग धरून जगली  आणि आता काढणीच्या वेळेला निसर्गाने कहर केला असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उडीद मूग ही खरीप पिके कापणीसाठी आलेली असताना सर्व खरीप पिकांमध्ये पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पायही ठेवता येत नाही तरीही अशा परिस्थितीत शेतकरी आलेले पिक काय तरी पदरात घेण्यासाठी चिखल आणि पाण्यामध्ये कसरत करीत आहेत. यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची फारच धावपळ उडाली असून मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे. दररोज पाऊस विजांच्या कडकडाटासह येत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करणे कठीण झाले आहे. सोयाबीनचा भाव घसरला असून वाढत्या महागाईमुळे मजुरीचे दर मात्र वाढले असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यातच पिकाची उत्पादनक्षमता कमी झाल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून या सर्व बाबींचा फटका बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारच्या मदतीसाठी अद्याप पुढे आलेले नसल्यामुळे अन्नदाता शेतकरी मात्र त्रस्त झाला असून संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत. गुडघाभर पाण्यामध्ये आणि चिखला मध्ये शेतकरी असलेली पिके कापुन हातात चवाळे धरून पीक गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोयाबीन कापणी करून लावलेल्या गंजी वाऱ्याने उडत आहेत तसेच शेतकऱ्यांनी बनिमीवर झाकलेले ताडपत्री, चवाळे इत्यादी वस्तू ही वाऱ्याने उडून जात असल्यामुळे शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था अतिवृष्टीमुळे झालेली आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करताना शेतकरी मात्र सध्या हवालदिल झाल्याचे चित्र संपूर्ण औसा तालुक्यामध्ये दिसत आहे, तर हे संकट म्हणजे आस्मानी असून विमा, अनुदान आदी मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळाली तर मोठा दिलासा अनेक शेतकऱ्यांना मिळणार असून यामुळे अनेक कुटुंबे सुखी होणार आहेत.

Post a Comment

0 Comments