ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
धीरज रखो सब ठीक हो जायेगा
विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय आमदार धीरज देशमुख यांनी घेतल्यानंतर मी एक लेख लिहिला होता,त्या लेखाचे हेडिंग होते,'धीरज रखो सब ठीक हो जायेगा'..ज्यांना ज्यांना धीरज देशमुख यांच्या राजकारण प्रवेशावर शंका होत्या त्या सगळ्यांना मला फक्त हेच सांगायचे आहे की, हा लंबी रेसचा घोडा आहे, थोडा धीरज रखो.. आज धीरज देशमुख यांची निवड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी करण्यात आली आणि दिलीपराव देशमुख यांनी आपल्या राजकीय पदाचे जे हस्तांतरण सहजपणे घडवून आणले त्याला आज पूर्णविराम मिळाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे, आज त्या बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची आणि उपाध्यक्षपदी Adv.प्रमोद जाधव यांची केलेली निवड सर्वार्थाने योग्य की अयोग्य हा येणारा काळ दाखवेल..
तो लेख मुद्दामहून जशास तसा देत आहे..
धीरज रखो,सब ठीक हो जायेगा..
महाराष्ट्राच्या राजकारणात लातूरची वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या विलासराव देशमुख यांच्या दुसऱ्या मुलाने म्हणजेच धीरजने आज आपली उमेदवारी दाखल केली, ज्या भावना अमित देशमुख यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर होत्या त्याच भावना आज परिवाराच्या दिसून आल्या.विलासराव देशमुख यांच्या जाण्याने परिवार पोरका झाला होता. काका दिलीपराव देशमुख यांनी तो अत्यंत शांतपणे हाताळला. अमित देशमुख यांना राजकरणात यशस्वीपणे उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.काही चुकले तरी शांतपणे समजावून सांगण्याची दिलीपराव यांची पद्धत अमित देशमुख यांना अनेक राजकीय डावपेच शिकवण्याच्या कामी आली आहे.आज अभिनेता रितेश, जेनेलिया यांच्यासह आई वैशालीताई यांच्यासह सगळा परिवार आज फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होता. मी विलासराव देशमुख यांच्या गतवैभवात पुर्णपणे अंतर्मुख झालो. महाराष्ट्राच्या राजकरणात या माणसाचे वजन मी पाहिले आहे. मुंबई च्या वरळी येथील निवासस्थानी अमित, रितेश आणि धीरज ही सगळे खूप लहान असताना पाहिले आहेत.एका पिढीची सूत्रे दुसऱ्या पिढीच्या हाती येताना विलासराव यांची आठवण होणे साहजिक आहे. लातूरच्या राजकारणात या दोन्ही भावांच्या येण्याने खूप मोठा फरक पडणार आहे. काही गोष्टी अंगभूत येत असतात, लढवय्या बापांची पोर जस भांडणाला भित नाहीत, तसे राजकीय परंपरा असणारी घराण्यातील मुले राजकारण आपोआप शिकून जातात. मुंबईच्या वातावरणात वाढलेली ही मुले आपल्या मातीत रुजतील का?हा सर्वांना पडलेला प्रश्न मात्र दोघांनीही अत्यंत शांतपणे राजकारणाची सूत्रे हाती घेतलेली दिसली आणि दोघातही विलासराव साहेब हुबेहूब उतरलेले दिसून येतात.विलासराव देशमुख यांनी नाती खूप जपली,मैत्री जपली. दिलीपराव देशमुख यांनी एक शिस्त निर्माण केली. बँक, कारखाना, सहकार भरपूर समृध्द केला. विलासराव देशमुख म्हणायचे,सायकल फिरणारे कार्यकर्ते मोटार सायकलवर आले, मोटार सायकलवर फिरणारे जिपमध्ये फिरू लागले आणि जीपमध्ये फिरणारे कारमध्ये फिरू लागले. परिसर इतका समृध्द केला. मला वाटत, त्यांचा वारसा पुढे या पिढीने चालवावा. ज्यांना ही घराणेशाही वाटते त्यांनी,राजकारणात येणाऱ्या अभ्यासू घराणेशाहीचे स्वागत करावे. काहीही माहिती नसणारे अनेकजण महाराष्ट्रात आज बापाच्या जीवावर राजकारणात येत आहेत. इथे मात्र दोघेही तितकेच अभ्यासू,जाणकार आणि प्रश्न समजून घेणारे आहेत. जे धीरजला नाव ठेवतात त्यांनी जिल्हा परिषदेत झालेली भाषणे जरूर ऐकावीत. विलासराव यांची छबी त्यांच्यात आहे. बाकी आजुबाजुच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा स्वार्थ न बघता लोकांच्या प्रश्नासाठी त्यांना खुल करून द्यावं. गढीवर बसून कामे करण्याचे दिवस आता गेले आहेत. लोकांना सहज उपलब्ध होणारे राजकारणी हवे आहेत. हे दोन्ही बंधू नक्कीच या भागाला न्याय देतील. ज्यांना धीरज विषयी शंका आहे त्यांच्यासाठी, जरा धीरज रखिये, सब ठीक हो जायेगा...
संजय जेवरीकर (ज्येष्ठ पत्रकार तथा सरपंच,जेवरी)
0 Comments