औस्यातील मुख्य चौकाने घेतला मोकळा श्वास,"मराठी अस्मितेचा इशारा"च्या बातमीचा परिणाम
शेख बी जी
औसा: दि.16. औसा शहरामध्ये हाश्मी चौक येथे सतत चक्काजाम होत असल्याची बातमी "मराठी अस्मितेचा इशारा" या वर येताच बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले व काही दिवसातच चौकात झालेले अतिक्रमण व वाहनांचा होणारा चक्काजाम दूर करण्यासाठी धावपळ सुरु झाली.
'अखेर किती दिवस औसेकर सहन करणार चक्काजाम' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. याचा परिणाम म्हणून बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाने जोरदार तयारी केली. संबंधित लोकांना नोटिसा देऊन झालेले अतिक्रमण दूर करण्यास सांगितले. हे अतिक्रमण जर स्वतःहून नाही काढले तर प्रशासन बुलडोजरच्या सहाय्याने अतिक्रमण दूर करेल. आशा प्रकारची नोटीस अतिक्रमण करणार्यांना देण्यात आली व आज दिनांक 16 जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून अतिक्रमण दूर करण्यासाठी जेसीबी, क्रेन मशीन च्या साह्याने अतिक्रमण हटविण्यात आले.
या अतिक्रमण हटविण्यामध्ये या ठिकाणी आलेली झाडे देखील तोडण्यात आली. झाडे तोडल्याने मात्र चौकातील निसर्गरम्य वातावरण नाहीसे झाले आहे. हे अतिक्रमण दूर करण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता. येणाऱ्या काळात या रोड वरती उड्डाणपूल होणार की एवढाच रस्ता राहणार? या चर्चांना उधाण आले होते. उड्डाणपूल झाले तर शहरात बेरोजगारी वाढेल अशा प्रकारची चर्चा करत असताना नागरिक दिसून आले.
एकंदरीत या ठिकाणी वाहनांचा होणारा चक्काजाम दूर झाला आहे. चौकाने आज मोकळा श्वास घेतल्याची चर्चा शहरात होती.



0 Comments