प्रा.डॉ.शिवाजी सोनटक्के यांच्या लेखणीतून....
गोविंदरावजी भोपनिकर साहेब: एक आधारस्तंभ
माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली, त्यापैकी एक तुम्ही म्हणून या वाढदवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा! या वाढदिवसाच्या निमित्ताने गोविंदरावजी भोपनिकर साहेबांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेवूया. गोविंदराव अर्जुनराव बिरादार (भोपनिकर) साहेबांचा जन्म 27 सप्टेंबर 1960 रोजी देवणी तालुक्यातील भोपणी येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे चालवत भोपणी या गावच्या राजकारणापासून देवणी व उदगीर तालुक्यात त्यांनी राजकारणातील महत्वाचे पदे भूषवित अनेक उल्लेखनीय कार्य केले आहेत. साहेबांचे प्राथमिक शिक्षण उदगीर येथील शामार्य प्रार्थमिक विद्यालय, माध्यमिक शिक्षण श्यामलाल हायस्कूल व उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे झाले. त्यांचे वडिल अर्जुनराव बिरादार हे भोपणीचे 15 वर्ष सरपंच होते. अर्जुनराव बिरादार यांनी त्यांच्या कार्यकाळात भोपनी गावात अनेक विकास कामे केली. त्यांनी उदगीर येथील बसस्थानकासमोर हॉटेल आणि किराणा दुकानाचा व्यवसाय सुरु केला. सदरील व्यवसायाकडे गोविंदराव भोपनिकर साहेबांनी यायचे ठरविले आणि भोपनी गावचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली. सन 1980 ते 1995 या काळात बिनविरोध सरपंच म्हणून तब्बल 15 वर्ष त्यांनी भोपनी गावाचा विकास केला. त्यानंतर त्यांनी राजकारणातील एक एक पद मिळवत त्या त्या पदाच्या माध्यमातून देवणी, उदगीर तालुक्यातील गावच्या, जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केला. 1985 पासून आजतागायत भोपणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संजय गांधी निराधार योजना सदस्य, देवणी व उदगीर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, रोजगार हमी योजना सदस्य, महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन, रसिका अर्बन क्रेडिट को - ऑप. सोसायटीचे चेअरमन, रसिका वेअर हाऊसचे चेअरमन, रसिका फुड प्रोसेसिंग कंपनीचे चेअरमन, युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे अध्यक्ष इत्यादी पदावर राहून गोविंदराव भोपनिकर साहेबांनी समाजकारण, राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. गावचे राजकारण करीत असतानाच त्यांनी काँग्रेस पक्षात सक्रीय कार्य करीत पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. उदगीर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी पक्ष चळवळी मजबुत केल्या. उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना भोपनिकर साहेबांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बाजार समितीचे उत्पन्न 80 लाखा वरून 02 कोटींपर्यंत नेले. बाजार समितीचे संगणकीकरण, मार्केट यार्डात रस्ते, नाल्यांची कामे, मुताऱ्यांची व्यवस्था, हमाल मापाडी यांच्या बैलांसाठी शेडची व्यवस्था, शेतकऱ्यांच्या जनावरांच्या उपचारासाठी 50 रोगनिदान शिबिरांचे आयोजन, शेतमाल तारण योजना मोठ्या प्रमाणात राबविणे, मार्केट यार्डात 36 गाळ्यांचे बांधकाम करून ती लिलाव पद्धतीने वाटप करून बाजार समितीला 01 कोटी रुपये Deposit मिळवून देणे, देवर्जन यात्रा, उदगीर यात्रा, देवणी पशुप्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसे देणे, शेतकऱ्यांना मोफत सेवा मिळावी म्हणून उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयात 51 हजार रुपयांची देणगी देणे, मुंबई येथील अतिवृष्टीग्रस्तास मदत म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी 02 लाख 51 रुपये निधी देणे, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी गुळ मार्केट सुरु करून त्यासाठी गोदामे उदगीर व देवणी येथे बांधणे, देवणी येथे 500 मॅट्रीक टनाचे गोदाम बांधणे, 13 गाळ्यांचे वाटप करणे, देवणी येथील न्यायालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, उदगीर येथे जनावरांच्या बाजारासाठी 40 लाख रुपये खर्चून जनावरांसाठी शेड उभारणे, कॅन्टीन, सरंक्षण भिंतींची व्यवस्था अशा प्रकारच्या अनेक सेवा, सुविधा गोविंदराव जी भोपनिकर साहेबांनी जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब आणि दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सहकार्याने देवणी तालुक्यात अनेक तलावांची कामे झाली. देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन या भागात जागृती शुगर्स आलयांसेस अँड कंपनी सुरु व्हावी यासाठी सतत 02 वर्ष भोपनिकर साहेबांनी सातत्याने प्रयत्न करून या कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून आवश्यक तेवढी जमिन उपलब्ध करून देवून पाठपुरावा केला. त्यामुळे जागृती शुगर्स चे 2010 मध्ये भूमिपूजन करण्यात आले आणि 2011 मध्ये सदरील कारखाना सुरु झाला. त्यामुळे या भागातील बेरोजगारांना, शेतकऱ्यांना कामे मिळाली. देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, शेतमजुरांना व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम श्री. भोपनिकर साहेबांनी केले आहे. सन 2003 मध्ये महात्मा फुले सुत गिरणीचे चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ही सूतगिरणी तोट्यात असताना देखील ती चालू करण्याचे धाडस भोपनिकर साहेबांनी केले. रसिका अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटीच्या माध्यमातून उदगीर शहरातील छोटे, मोठे उद्योग करणाऱ्या गरजूं व्यावसायिकांना कर्ज पुरवठा केला जातो. देवणी येथील रसिका वेअरहाऊस आणि रसिका प्रोसेसींग कंपनीच्या माध्यमातून देखील देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम भोपनिकर साहेबांच्या हातुन होत आहे.
राजकारणात जनतेची कामे करीत असतानाच भोपनिकर साहेब यांना देवणी तालुक्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची वानवा जाणवली. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक काळातील उच्च शिक्षण देण्याच्या हेतूने देवणी येथे रसिका महाविद्यालयाची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली. रसिका महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. दूरस्थ शिक्षणाची सोय देखील महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि पुणे येथील टिळक विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्राच्या माध्यमातून केली जात आहे. देवणी तालुक्यातील विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची सोय व्हावी म्हणून भोपनिकर साहेबांनी आबासाहेब इंग्लिश स्कूलची स्थापना रसिका शैक्षणिक संकुलात केली आहे. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. पॅटर्न प्रमाणे दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. तसेच सन 2022-23 या चालु वर्षापासून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी इंग्रजी शाळेची सुरुवात करून मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न साहेब करित आहेत. त्यामुळेच गोविंदरावजी भोपनिकर जनसामान्यांना आधारस्तंभ व पाठीराखे वाटतात. कृषि, बँकिंग, शिक्षण, राजकारण आणि समजकारण इत्यादी क्षेत्रात असामान्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, जनसामान्यांच्या प्रश्र्नांची जाण असणारे, दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून गोविंदरावजी भोपनिकर सुपरिचित आहेत. देवणी तालुका अनेक दृष्टीने मागासलेला होता. परंतु साहेबांच्या ध्येयवादी, अभ्यासपूर्ण, त्यागी आणि निःस्वार्थी वृत्तीमुळे तालुक्याचा कायापालट होण्यास नक्कीचं मदत झाली आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही असे मला वाटते. तसेच एकनिष्ठ कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, कृषिभूषण, विकासरत्न, शेतकऱ्यांचे कैवारी, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट संभाषण कौशल्य असणारे अशी गोविंदराव भोपनिकर साहेबांच्या व्यक्तिमत्वाची ओळख सांगता येईल.
माणसाच्या आयुष्यात काही
माणसं अशी येतात
जे आपल्या जीवनात त्यांचे एक
वेगळे स्थान निर्माण करतात
माझ्या आयुष्यातील त्या
माणसांच्या गणतीत आपलं
स्थान पहिले आहे.
मा श्री गोविंदरावजी भोपनिकर साहेब,
आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा...!
प्रा.डॉ. शिवाजी सोनटक्के(उपप्राचार्य तथा ग्रंथपाल) रसिका महाविद्यालय, देवणी जि. लातूर





0 Comments