नर्सचा विनयभंग करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
नेरूळ: डी.वाय.पाटील रुग्णालयातील नर्सची छेडछाड केल्याप्रकरणी विनयभंगाच्या गुन्ह्यात २०१५ मध्ये अटक करण्यात आलेल्या व जामीन मिळाल्यानंतर मागील सात वर्षांपासून न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीसाठी गैरहजर राहणाऱ्या राहुल बडदाळे या आरोपीचा नेरुळ पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याच्या विरोधात आजामीन पात्र वॉरंट जारी केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणात अटक करण्यात - आलेला आरोपी राहुल बडदाळे हा कर्नाटकातील बसवकल्याण जिल्हा बिदर येथील राहणारा असून या २०१५ मध्ये नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलमधील एका नर्सची छेड काढून तिचा विनयभंग केला होता. नेरुळ पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने न्यायालयाकडून जामीन मिळवून आपली सुटका करून घेतली होती. मात्र त्यानंतर राहुल सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत होता. त्यामुळे न्यायालयाने आजामीन पात्र वॉरंट जारी केले होते. त्या अनुषंगाने नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय कांगणे व रशीद पटवेकर यांनी या आरोपीचा शोध सुरू केला होता. गत रविवारी राहुल हा उलवे येथे मामाच्या घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उलवे भागातून ताब्यात घेलते. त्यानंतर त्याला अटक करून सोमवारी बेलापूर न्यायालयात हजर केले.

0 Comments