Latest News

6/recent/ticker-posts

रोडवर वाहन चालवताना नियम तोडू नका. आपण कशाप्रकारे वाहन चालवता यावरून आपल्या मानसिकतेचे दर्शन घडते- प्रा. शरदचंद्र डुमणे

 प्रा. शरदचंद्र डुमणे यांनी रस्ते वाहतूक संदर्भाने तात्विक निरीक्षणातून केलेले वास्तववादी लेखन

रोडवर वाहन चालवताना नियम तोडू नका. आपण कशाप्रकारे वाहन चालवता यावरून आपल्या मानसिकतेचे दर्शन घडते- प्रा. शरदचंद्र डुमणे

कोणी आपणास असे म्हटले की आपली वैचारिक पातळी उध्वस्त आहे, आपणास वाहतुकीचे कायदे मोडण्याची सवय आहे. आपण संवेदना शून्य व क्रूर आहात, दूरदृष्टी रहित आहात, स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेचे बाबत अजिबात काळजी न करणारे आहात, भावनाशून्य आहात, तर तुम्ही लगेच रागात याल व भांडायला सुरू कराल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे चूक मूल्यमापन झाले आहे असे भासवाल.

            पण मित्रांनो वरीलपैकी एकही विशेषण आपणास लागू होतो का हे जाणून घेण्यासाठी तुमची वाहन चालवण्याची पद्धत कशी आहे हे विचारात घ्यावे लागेल व मगच काही तरी सिद्ध करता येईल.

            वास्तविक पाहता तुमचे खरे व्यक्तिमत्व अथवा चरित्र रोडवर तुमच्या वर्तनकीवर झळकू लागतं. असं एक मोठ्या विचारवंताचे वक्तव्य आहे.

              खालील परिच्छेदांमध्ये जरी प्रत्येकी एकच पेहलू दर्शविला गेला आहे, तरी तो सर्व पक्ष स्वभाव ओळखणारा होऊ शकेल.

नियमतोड्या:

                रात्रीच्या वेळी तुम्ही रेड सिग्नल चालू असलेल्या स्पॉटवर आलात. त्याकडे दुर्लक्ष करून सरळ पुढे जात असाल तर त्याचा अर्थ असा असेल की, तुम्ही कायदा बाजूला सारण्यात तरबेज आहात.

 हेल्मेट वापरणे (टू व्हीलर साठी) व सीट बेल्ट लावणे (कार साठी) या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेता का?

                 तसे असेल तर ते हे दर्शविते की,तुम्ही स्वतःच्या जीवाची व अवयवाची काळजी न घेणाऱ्यापैकी आहात. तुम्ही निष्काळजी आहात.

अविचारी:

                 तुम्ही ट्राफिक सिग्नलच्या अगदी जवळ आलात आणि रेड सिग्नल लागते तरी न थांबता पुढील वाहन जात आहे म्हणून त्या मागोमाग बांधल्यागत जाता. असे असल्यास तुमची मानसिकता कशी आहे? तुम्हाला दुसऱ्याची परवा नाही. ते थांबू शकतात, त्यांना वेळ आहे तुम्ही थांबू शकत नाही तुमच्याकडे वेळ नाही. त्यामुळे थांबणार नाही असा विचार कराल तर तो अविचारी असेल.

 बेभरवशाचे:

                 तुम्ही रेड सिग्नल लागले असल्यामुळे थांबला आहात. बाजूच्या रोडवर तुम्हाला आडवे जाणारे वाहन पण थांबली आहे म्हणून ग्रीन सिग्नल नसताना देखील काही धोका नाही असे समजून पुढे जाता का? याचा अर्थ तुम्ही फालतू रिक्स घेण्यास मागेपुढे पाहत नाही असा होतो. तुम्ही त्यांच्या परिणामाबद्दल विचार करीत नाही काही सेकंदासाठी मोठी रिक्स घेता म्हणजे तुम्ही अविवेकी व बेभरवशाची मनोरचना असलेले आहात हे सिद्ध कराल.

स्वार्थी:

                एखाद्या देवळात जाण्यासाठी अगदी थोडा वेळ तुम्हाला थांबायचे आहे. अशा प्रसंगी तुम्ही आपले वाहन योग्य ठिकाणीच लावता की लगेचच निघायचे आहे असे समजून दुसऱ्यांना अडचण होईल अशा प्रकारे लावता? वरीलपैकी दुसरा पर्याय निवडत असाल तर सिद्ध होते की, दुसऱ्याबद्दल तुम्ही थोडाही विचार करीत नाही अर्थात तुम्ही स्वार्थी आहात.

स्वकेंद्रीत व अविवेकी:

                तुम्ही ट्राफिक सिग्नल जवळ आहात. व बरीचशी वाहने तुमच्यापुढे उभी आहेत रस्त्यावर दुभाजक नाही अशावेळी तुमचे वाहन सांदीतून रेटून विरुद्ध दिशेच्या ओळीमध्ये घुसता का?अथवा शांतपणे पूर्वीच्याच लाईन मध्ये थांबता? जर विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसत असाल तर त्या ट्राफिकला अडथळा होईल हे तुमच्या लक्षात येत नाही का? त्यांना पुढे जाणे शक्य होते पण तुम्ही समोर आल्यामुळे ते पण जागेवरच थांबले याचा तुम्ही स्वकेंद्रीत व स्पष्टपणे अविवेकी आहात.

 तुमचे काही सेकंद वाचवण्यासाठी तुम्ही तासभर ट्राफिक जाम करत आहात.

मूर्ख:

            रॉंग साईडने मुख्य रस्त्यावर येताना थोडावेळ का होईना, थांबून निरीक्षण करून मग मेन रोडवर येऊन वाहतुकीत मिसळता की पूर्वीच्याच गतीने मेन रोडवर घुसता? जर न थांबता सरळ मेन रोडवर येत असाल तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे कारण मेन रोडवरील जाणारे एखादे वाहन तुम्हाला ओळखू शकते व मोठा अपघात होऊ शकतो.

नियोजन हीन:

                तुम्हाला पुढल्या क्रॉसिंग वर उजवीकडे वळायचे आहे. मग अगोदर पासूनच उजव्या बाजूच्या लेनकडे हळूहळू वाढता की पुढे जाण्याच्या गाड्यांना काटकोनात कट मारून शेवटच्या क्षणी वळता. दुसऱ्या प्रकारची आपणास सवय असेल तर तुम्ही नियोजन हीन व निकृष्ट आहे.


अपरिपक्व:

              एखाद्या T जंक्शन वर येऊन तुम्हाला उजवीकडे वळायचे आहे. अशावेळी एकदम उजवीकडे वळता की थोडा वेळ थांबून, निरीक्षण करून, संतपणे वळता? वरीलपैकी पहिला पर्याय निवडत असाल तर तुमचे वागणे अपरिपक्व असेल.

अस्ताव्यस्तपणा:

                आपण ज्या लेन मध्ये आहोत त्यातच राहून पुढे पुढे सरकण्याचे तुम्हाला पटते की लेन तोडून जशी वाट मिळेल तसे नागमोडी नागमोडी चालीने सरकायचे आवडते? वरीलपैकी दुसऱ्या गोष्टीची आपणास सवय असल्यास "अस्ताव्यस्तपणा" हा आपल्या स्वभावाचा पैलू आहे असे समजण्यास हरकत नाही.

असुरक्षित:

                 एक दिशा मार्ग असताना आपण विरुद्ध बाजूने वाहन देत असाल तर तुम्ही कायदा मोडणाऱ्या पैकी आहात हे स्पष्ट आहे. स्वतःच्या व दुसऱ्याच्या सुरक्षिततेचे बाबत तुम्ही निष्काळजी आहात.


ध्वनी प्रदूषणास कारणीभूत:

                वाहन चालवताना विनाकारण जोरात हॉर्न वाजवत नेता का? कंपनीचे ओरिजनल हॉल हॉर्न बदलून (विशेष करून टू व्हीलर वाले) मोठ्या कर्कश्य आवाजाचे हॉर्न गाडीला बसून गाडी चालवता का? तशी असेल तर तो गुन्हा होऊ शकेल. हे लक्षात घ्या स्वतःचे व इतरांचे कान कालांतराने डॅमेज कराल यात शंका नाही.


जीवघेण्या फॅशनचे चहेते
:

                मोबाईलवर धोकादायक स्पॉटवर सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांनी आपले जीव गमावले आपल्याला वाचनात आहे. त्याचप्रमाणे गाडी चालवताना (विशेष करून टू व्हीलर) एका हाताने मोबाईल धरून एकाच हाताने स्टेयरिंग सांभाळायचे ही नवीन फॅशन सर्वत्र दृष्टीस पडत आहे पण हे किती रिस्की आहे याचा कोणी विचार करीत नाही. अचानक काही इमर्जन्सी समोर आली तर वाहने कसे कंट्रोल होणार ? ही सवय टाळलेलीच बरी.

                 तर मित्रांनो वरीलपैकी एकही विशेषण आपणास लागू पडत नसेल तर "यु आर ए वंडरफुल ड्रायव्हर" असे म्हणावे लागेल. आपण एक परीपक्व,समजूतदार लोकहिताचा विचार करणारे आहात असे आपोआपच सिद्ध होईल.


प्रा. शरदचंद्र डुमणे,लातुर


Post a Comment

0 Comments