लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निकाली ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये आरोग्य विभाग अदा करणार
साठ दिवसाच्या आत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश माझं लातूर परिवाराच्या ऐतिहासिक आंदोलनास अखेर यश
सतीश तांदळे
लातूर: दि.२० - जिल्हा रुग्णालय लातूरसाठी कृषी महाविद्यालय लातूर येथील दहा एकर जमीन हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये अदा करण्यात येणार असून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया साठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नासाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने म. गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत हा निर्णय झाल्याने लातुरात नागरिकांना आणखी एक आरोग्याची सुविधा उपलब्ध झाली म्हणून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
लातूरचे नेते दिवंगत विलासराव देशमुख यांनी लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली. त्यामुळे लातूरचे जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आले. नियमाप्रमाणे जिल्हा रुग्णालय पाच वर्षात होणे आवश्यक असताना त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. जिल्हा रुग्णालयाला मंजुरीही देण्यात आली होती तर विद्यमान सरकारने पाचशे खाटाच्या जिल्हा रुग्णालयास मान्यता दिली. परंतु ते कागदावरच राहिले होते.
माझं लातूरच्या वतीने या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री यांना निवेदनही देण्यात आली होती. म. गांधी चौकात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यासह सर्वांनीच हा प्रश्न तातडीने निकाली काढू, असे आश्वासन दिले होते. १९ जून रोजी यासंदर्भात शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार कृषी विद्यालय लातूर येथील सर्वे नंबर ३७ मधील १० एकर जमीन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून जिल्हा रुग्णालयासाठी हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली. सदरील जमिनीचा मोबदला ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये कृषी विभागास वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली. जमीन हस्तांतरणाची कार्यवाही महसूल विभागाच्या वतीने जिल्हाधिकार्यांनी पूर्ण करावी. हस्तांतरणासाठी दोन्ही विभागामार्फत सामंजस्य करार जिल्हास्तरावर करण्यात यावा. जमिनीच्या अभिलेखात सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा शल्य चिकित्सक लातूर याचा स्पष्ट उल्लेख करावा. महसूल विभागास देय रक्कम विद्यापीठाने अदा करावी. जास्तीत जास्त साठ दिवसाच्या आत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. वित्त विभागाने याची तरतूदही केलेली आहे.
या जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवारातील सदस्यांसोबतच आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदिप ढेले, डॉ लक्ष्मण देशमुख, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, ॲड. बळवंत जाधव, माजी खासदार सुनिल गायकवाड, अभिजीत देशमुख, ॲड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, दिपक सुळ, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विश्वजीत गायकवाड, खासदार डॉ. शिवाजी काळगे, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मंत्री संजय बनसोडे, यांच्यासह अनेकांनी पाठपुरावा केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासह विविध ५८ पक्ष संघटनांनी जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूरच्या आंदोलनास पाठिंबा दिला होता.




0 Comments