क्रीडा गुणांकनात ४४ प्रकारांचा समावेश, लवकरच अध्यादेश
पुणे : (क्रीडा प्रतिनिधी/अश्फाक तांबोळी) महाराष्ट्रातील तब्बल ४४ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये ग्रेस गुणांचा फायदा मिळणार आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून, लवकरच याबाबत अध्यादेश जारी करण्यात येणार आहे. राज्यातील ४४ क्रीडा प्रकारांचा ग्रेस गुणांकनामध्ये समावेश करावा, यासाठी शालेय खेळ क्रीडा महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांनी गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून सातत्याने मागणी केली होती. या क्रीडा प्रकारांमध्ये राज्यातील चार लाखांहून अधिक खेळाडूंचा समावेश होता. क्रीडा विभागाकडून अनेक वेळा शासनाला प्रस्ताव पाठवले गेले, परंतु काही अधिकाऱ्यांच्या टेबलावर प्रस्ताव अडकल्याचे दिसून आले.
मुंबईतील मंत्रालयात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी शालेय खेळ क्रीडा महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष शाम भोसले, पदाधिकारी, क्रीडा सचिव, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, उपसंचालक नवनाथ फडतरे यांच्या उपस्थितीत चर्चा घेतली. शासनाकडे वारंवार ४४ क्रीडा प्रकारांच्या गुणांकनाबाबत मागणी झाली होती. या गुणांकनाला आता क्रीडामंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
राज्यातील ४४ क्रीडा प्रकारांना ग्रेस गुणांकनात समाविष्ट करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे हजारो खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होईल. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल. क्रीडा विभागाने हे निर्णय तात्काळ अंमलात आणावेत, अशी अपेक्षा आहे.
_सी ए तांबोळी{ उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक } ऑल इंडिया ट्रेडिशनल रेसलिंग अँड पँक्रेशन फेडरेशन
या ४४ खेळांमध्ये बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सिंग, आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, हाफकिडो वॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलंबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंटाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकवॉल, चायक्वाँदो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट यांचा समावेश आहे. आठवडाभरात या गुणांकनाच्या अटी-शर्ती तयार करून मंत्रालयात पाठवण्याच्या सूचना क्रीडा आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच, याबाबतचा सविस्तर अध्यादेश लवकरच जारी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हा निर्णय राज्यातील अनेक खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.



0 Comments