Latest News

6/recent/ticker-posts

चाकूरात अल्पवयीन मुलाच्या खूनात बनावाचा उलगडा; कुटुंबीय महिलेस अटक

चाकूरात अल्पवयीन मुलाच्या खूनात बनावाचा उलगडा; कुटुंबीय महिलेस अटक


लातूर : जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडवली होती. अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरूपाच्या या घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच शास्त्रीय, तांत्रिक व अत्यंत सूक्ष्म तपासाद्वारे यशस्वी उलगडा केला असून एका महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे. संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. दि. 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी त्यांचा सात वर्षीय मुलगा देवांश व त्याचा चुलत भाऊ साईचरण हे सकाळी सात वाजता घराबाहेर खेळण्यास गेल्यानंतर परत न आल्याची माहिती चाकूर पोलीस ठाण्याला दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ शोधमोहीम सुरू केली व परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजमधून सकाळी अंदाजे 07.07 वाजता देवांश यास त्याचा चुलत भाऊ साईचरण उर्फ स्वयंम हा सायकलवर घेऊन जात असल्याचे दिसून आले. हा तपासातील अत्यंत महत्त्वाचा अनुभट ठरला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांची व परिसरातील संभाव्य संशयितांची सखोल चौकशी सुरू केली.

शोधमोहिमेदरम्यान दुपारी अंदाजे 01.30 वाजता उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ, ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांश याचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर व पोलीस निरीक्षक चाकूर यांनी तत्क्षणी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक टीम व फिंगरप्रिंट विभागाची टीम बोलावून तांत्रिक व सबळ पुरावे संकलन करण्यात आले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळ भेटून तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची एकूण पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक तपास, संशयित व्यक्तींचा मागोवा, गुप्त बातमीदारांकडून माहिती संकलन तसेच कुटुंबीय व साक्षीदारांची चौकशी या सर्व अंगांनी तपास अत्यंत वेगाने व समन्वयाने आगावढवला.

तपासादरम्यान कुटुंबातील पार्श्वभूमी, परस्पर संबंध, पूर्वीचे वाद तसेच संशयितांच्या हालचालींचा विश्लेषण करताना फिर्यादी यांची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यात आला. घटनेनंतर तिचा मोबाईल बंद असणे, काही काळ घराबाहेर असणे व चौकशीदरम्यान विसंगत माहिती देणे या बाबींमुळे पोलिसांनी तिच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. अत्यंत वैज्ञानिक व कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी करून परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती यांची सांगड घातली असता आरोपी अनिता स्वामी यांनी गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासानुसार फिर्यादी यांच्या दिराच्या भावाच्या पत्नी अनिता यांच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून अनिता व त्याच्या पतीमध्ये सातत्याने वाद व भांडणे होत होती.

सदर प्रकरणी अनिता स्वामी यांनी स्वतःच्या आणि आपल्या दिराच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करून दिराच्या मुलाचा खून करून त्याचा आरोप पतीच्या अनैतिक संबंधातील महिलेवर टाकून तिला अडकवण्याचा कट शिजवला. त्यानुसार अनिता यांनी निर्दोष बालक देवांश याचा खून केला व गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह उजळंब रोडवरील पडक्या घराजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला टाकून दिला. सदर प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0196/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) व 238 अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी अनिता दिनेश स्वामी हिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून खून प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? याचाही बारकाईने तपास करण्यात येत आहे. या संपूर्ण कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच त्यांच्या पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत समन्वयाने व कौशल्याने कामगिरी बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर करत अल्पावधीतच गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस अटकबजावण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे.

Post a Comment

0 Comments