मुलींच्या सुरक्षेसाठी पीएमश्री गौर शाळेचा 'मार्शल आर्ट्स' उपक्रमाला गती; विद्यार्थिनींना कराटे ड्रेस व साहित्य वितरित
गौर :( प्रतिनिधी/निलेश तावडे ) मुलींच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणाऱ्या 'मार्शल आर्ट्स' उपक्रमाला गती देण्यासाठी पीएम श्री गौर शाळेत विशेष वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिनांक १८ एप्रिल रोजी शाळेतील सर्व विद्यार्थिनींना कराटे ड्रेससह मार्शल आर्ट्सचे आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले. हे साहित्य शाळेतच राहील आणि विद्यार्थिनी त्याद्वारे नियमित प्रशिक्षण घेतील, असे नमूद करण्यात आले. या उपक्रमामुळे मुली स्वावलंबी होत असून, त्यांच्यात आत्मरक्षा कौशल्ये विकसित होत आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भंडारी व सहशिक्षक बी. जी. सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार निलेश तावडे, मार्शल आर्ट्स प्रशिक्षक के. वाय. पटवेकर, सहशिक्षक व्ही. एम. क्षीरसागर, पी. एस. सूर्यवंशी, डी. आर. कांबळे, एस. जी. सोदले, सुवर्णा कांबळे, प्रेमला सुरवसे व शुभांगी गोडगे हे मान्यवर उपस्थित होते. बोलताना मुख्याध्यापक भंडारी म्हणाले, "हा उपक्रम मुलींच्या सुरक्षेसाठी मीलाचा दगड आहे. यामुळे त्या केवळ शारीरिकदृष्ट्या बळकट होत नाहीत, तर मानसिकदृष्ट्याही सक्षम होतात."
पीएम श्री योजनेंतर्गत राबवला जाणारा हा उपक्रम शाळेतील मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आला असून, आता साहित्य वितरणाने त्याला अधिक गती मिळाली आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह निर्माण झाला असून, स्वावलंबन व आत्मविश्वास वाढत आहे. स्थानिक पातळीवर असा उपक्रम मुलींच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.



0 Comments