Latest News

6/recent/ticker-posts

निटूर-ताजपुर पाणंद रस्ता पूर्णपणे खराब; शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तात्काळ सोडवू - नूतन जि.प. सदस्य रोहित विठ्ठलराव पाटील

निटूर-ताजपुर पाणंद रस्ता पूर्णपणे खराब; शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तात्काळ सोडवू - नूतन जि.प. सदस्य रोहित विठ्ठलराव पाटील


निटूर :
दि. ८ एप्रिल : शेतीला जोडणारा निटूर ते ताजपुर हा महत्त्वाचा पाणंद रस्ता मागील मोठ्या पावसामुळे पूर्णपणे खराब झाला असून, यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निटूर व ताजपुर गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावरून नूतन जिल्हा परिषद सदस्य रोहित विठ्ठलराव पाटील यांनी आज सदर रस्त्याची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तात्काळ लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन रस्त्याची दुरुस्ती करू, असे त्यांनी आश्वासन दिले.


मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा पाणंद रस्ता अनेक ठिकाणी खचला असून, शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेणे, खत व बी-बियाणे आणणे अशा कामांसाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शेतकऱ्यांच्या सततच्या तक्रारींनंतर रोहित विठ्ठलराव पाटील यांनी आज सकाळी रस्त्याची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याच्या खराब भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि समस्या जाणून घेतल्या.


पाहणीवेळी उपस्थित शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोरदारपणे केली. यानिमित्ताने रोहित पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तात्काळ निधीची तरतूद करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करू. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे हेच आमचे प्राधान्य आहे." या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले.

निवेदनावर सह्या : उपसरपंच शिवराज सोमवंशी, बळीराम मदाळे, रंगनाथ निरगूडे, ईलाही तांबोळी, शिवाजी बाबर, गिरिधर हजारे, बालाजी लव्हे, श्रावण शिंदे, शिंदे चक्रधर, शिवाजी शिंदे, बालाजी गजभार, जिलानी शेख, गोविंद शिंदे, किसन कवडे.

Post a Comment

0 Comments