आता तुला सुट्टी नाही .....
कोरोनाच्या व्हायरसने अख्या जगात धुमाकुळ घातला आहे . यामुळे संपूर्ण जग थांबलं आहे. जगात हाहा:कार माजवणा-या कोरोनामुळे कित्येक व्यक्ती मृत्यूंना जवळून पाहत आहेत . मृत्यूच्या दारातील काहीजण उंबरठा ओलांडत आहेत. तर काहीजण दरवाजाच्या चौकटीपासून आपल्या माणसात परत येत आहेत. ह्या महामारीने स्वार्थी मानसांना अद्दल घडवली आहे. माणसातला ' मी ' पणा सुपडासाफ केला आहे. फक्त आता माणुसकी जगत आहे. मी पणाचा अहंम भावच संपून टाकला आहे.....असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.......
आठवतयं का पहा तुम्हाला वाचनीय असेल तर लगेच समजेल . गतवर्षात एक बातमी आली होती शिक्षणाच्या माहेरघर येथून म्हणजेच पुणे शहरातून थरकाप उडवणारी बातमी होती. पायाखालून जमीन सरकावी त्या पध्दतीने वाचताना पोटात गोळा उठत होता. तो दिवस माझ्यासाठी नैराशाने भरलेलाच गेला . काय म्हणावं या पिढीला ....बेभान वागणारी मुलं.... आपल्या कर्तव्यापासून कोसोदूर भरकटलेली असतात. न कळत चुका होतात ते ठिक आहे. पण अशी जाणून बुजून केलेली चूकच म्हणावी लागेल ..... एकूलता एक मुलगा . आईने लवकरच आयुष्यातून रजा घेतली होती . मुलाला बापानं शिकून मोठ केलं .... शिकला सवरला , इंग्रजी फाडफाड बोलायला लागला . उच्च शिक्षणासाठी परदेश गाठले ... पुणेरी शहरात बापाचे कोतूक होवू लागले . परदेशातच दोन हाताचे चार हात झाले . वेळ सरत गेली नात्यातला गोडवा संपत होता. तसा इकडे बाप ही खचत चालला होता . काळजी करणारं कोणी , जवळ उरलं नव्हतं . म्हणून वृध्दाश्रमात राहूनच देवाकडे जाण्याची वाट पाहत होता. काही कालांतराने देवाच्या द्वारी पोहचलाच .जनमाणसात उरले ते फक्त शरीर, त्यातला प्राण तर केव्हाच निघून गेला होता. मित्र मंडळी जमली आणि राहत्या घरी अंत्यसंस्कारासाठी आनल्या गेलं . शेवटचं रात्रभर स्वत:च्या घरात राहीला. मित्रांनी इकडून तिकडून मुलाचा नंबर मिळवला आणि फोन केला ...हॅलो अरे तुझे वडील तुला सोडून गेलेत .घरी आनले आहे. तु लवकर ये ... मुलाचे तत्परतेने उत्तर आले. आश्रमातून जसे आणले , तसे स्मशानात न्या आणि अंत्यसंस्कार उरकून टाका . मला यायला वेळ नाही ..... कशाला असावीत अशी नाती . जी शेवटही तीरस्काराने होईल . अपेक्षा तर सोडाच दोन शब्द प्रेमाचे देण्यास सुध्दा कंजुशीपणा ..छे ...हा कसला आलाय स्वार्थीपणा......
वर्ष उलटून गेलं नवीन वर्षात नवीन महामारी जन्माला आली आणि जो बापाच्या अंत्यविधिला आला नाही , तो पठ्ठ्या आपला जीव वाचवण्याकरीता पुण्यात स्वत:च्या घरी आला . कोरोनाला सोबत घेवून नियतीशी सध्या तो लढतो आहे. बापाकडून आयुष्याचं घेतलेलं कर्ज आता तो दवाखाण्यात फेडतो आहे....तो आल्याची बातमी पुण्यातील माझ्या मित्राने कळवली आणि थोडसं लिहावं वाटलं .........
ज्या पध्दतीने मानवी प्रवृत्तीच्या वेगाने , माणूसकीच्या जगाला केव्हाच मागे टाकले होते. तेव्हाच नाती गोती सरळ विसरुन गेली होती . लहानाचं मोठ झालास , चार पैशाची उब काय मिळाली . हे सर्व स्वावलंबी झाल्यामुळेच ना..... अरे ज्यांनी तूला त्या लायक बनवलं .....त्या रक्ताच्या नात्यांचाच विसर पडावा .... छे ..... कधीना कधी केलेल्या अहंकारी वृत्तीचा नाश होतो. हे मात्र नक्की .... नियती कधी कोणाला सोडत नाही लेका ....ते आता पहायला मिळत आहे....इथेच, याच मातीत सर्वकाही फेडून जा ....
आता तुला सुट्टी नाही ......
- अरुणकुमार मेहत्रे ,नवी मुंबई
0 Comments