Latest News

6/recent/ticker-posts

माठ,मडकी विक्रीसाठी परवानगी द्या

माठ,मडकी विक्रीसाठी परवानगी द्या


अ.भा.प्रजापती कुंभकार महासंघाची सरकारकडे मागणी


लातूर:(प्रतिनिधी) राज्यात कुंभार समाज पारंपारिक मडकी, माठ, रांजण, गणपती, वीट व मातीच्या वस्तू निर्मितीचा व्यवसाय करीत असून या व्यवसायावरच कुंभार कुटुंबांची उपजिविका चालते. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कुंभारांचा पारंपारिक वीट उद्योग, व्यवसाय बंद असल्याने उपासमार होत असे, मात्र ग्रामीण भागातील या मडकी व वीट उद्योगासाठी राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी दिलेल्या परवानगीचे अ.भा. प्रजापती कुंभकार महासंघाने स्वागत केले असून मातीपासून उत्पादित केलेल्या मडकी, माठ, डेरे, सुरई, रांजण विकण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी अ.भा. प्रजापती कुंभाकार महासंघाच्या माती कला विकास सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता कुंभार यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात वीट व्यवसाय करणार्‍या कुंभार कुटुंबांव्यतिरिक्त मडकी बनविणारी लाखो कुटुंबे आहेत. उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी लागणारे माठ, रांजण, डेरे, सुरई तसेच अक्षय तृतीयेनिमित्त पूजेसाठी लागणारे कलश सध्या कुंभार समाजाने बनवून ठेवले आहे. कुंभार कारागिरांना चार पैसे मिळविण्याचा हा हंगाम आहे. या कमाईवरच वर्षभर कुंभार कुटुंबांची उपजिविका चालते. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे कुंभारांनी बनविलेल्या मातीच्या या वस्तू बाहेर जावून विकत येत नसल्याने घरातच पडून आहेत.अतिशय छोट्या जागेत उपजिविका करणार्‍या या कुंटुंबाकडे मडकी ठेवण्यासाठी जागा नाहीत. त्यामुळे किमान अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पूजेचे कलश विकण्यासाठी व मातीची मडकी विकण्यासाठी परवानगी द्यावी. या काळात कुंभार समाजाकडून कुठल्या नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. प्रत्येक तालुक्यात ५० ते ६० लोकांना रस्त्यावर फिरण्यासाठी परवाना दिल्यास कुंभारांची उत्पादने विक्री करणे शक्य होणार आहे. त्यासाठी उद्योग मंत्र्यांनी सकारात्मक विचार करावा, अशी मागणी दत्ता कुंभार यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना ऑनलाईन पाठविलेल्या निवेदनात केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे.


Post a Comment

0 Comments