Latest News

6/recent/ticker-posts

गाव सांभाळा;लातूर जिल्ह्यातील सरपंच पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचा टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

गाव सांभाळा;लातूर जिल्ह्यातील सरपंच पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचा टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
 


लातूर जिल्हा कोविड-१९ मुक्त ठेऊ


२४ तास मी तुमच्या संपर्कात- पालकमंत्री अमित देशमुख



लातूर:(प्रतिनिधी) आजवर आपल्या सर्वांच्या परिश्रमातून लातूर जिल्हा कोविड-१९ मुक्त राहिला आहे. यापुढेही तो सुखरूप ठेवायचा आहे असे सांगून पदाधिकारी यांनी तुम्ही आपले गाव राखा मी चोवीस तास आपल्या मदतीसाठी सजग आहे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी सकाळी लातूर जिल्ह्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लॉकडाऊन-२ संदर्भाने माहिती दिली त्यांच्याकडून गावपातळी पर्यंतची माहिती घेतली, समस्या जाणून घेतल्या त्या सोडविण्याचे आश्वासन देऊन धीर दिला. गावपातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी अगदी सहजतेने संपर्क साधताना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आज संपूर्ण जग कोविड-१९ च्या विषाणू विरुद्ध लढते आहे,  देश आणि राज्याचे सरकार लढते आहे. जिल्ह्याचे तालुक्याचे प्रशासन लढते आहे त्याच पद्धतीने गावपातळीवर ग्रामपंचायतच्या वतीने ही लढा लढला जात आहे.
 अदयाप लढा संपलेला नाही
लातूर जिल्ह्यातील प्रत्येक घटक प्रमाणिकपणे लढल्यामुळेच आज आपला संपूर्ण जिल्हा कोविड-१९ मुक्त राहिला आहे. केंद्रशासनानेही आपल्या यशस्वी लढयाची दखल घेतली आहे. शासन, प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन आपण सर्वांनी केल्यामुळे कोविड-१९ चा शिरकाव आपल्या जिल्ह्यात झालेला नाही. परंतु अद्याप आपला लढा संपलेला नाही, लॉकडाऊनच्या संदर्भाने नियमात बदल होत राहतील परंतु जो पर्यंत कोविड-१९ वर प्रभावी उपचार पध्दती किंवा लस याचा शोध लागणार नाही तो पर्यत कमी अधिक प्रमाणात आपणाला लढा सुरूच ठेवावा लागणार आहे.


चोरून  येणाऱ्यांना लगेच गावात प्रवेश देऊ नका


सर्व घटकांच्या परिश्रमातून लातूर जिल्हा अदयाप कोविड-१९ चा शिरकाव होऊ शकलेला नाही हे जरी खरे असले तरी यापूढेही त्याच पध्दतीची काळजी न घेतल्यास संकट ओढावू शकते. यापूढेही सुखरूप रहायचे असेल तर परराज्यातील किंवा परजिल्हयातील कोविड-१९ बांधित रुग्ण आपल्या जिल्हयात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. ही बाब लंक्षात घेऊन जिल्हयाच्या सीमा कडेकोट बंद करण्यात आल्या आहेत. अपरिहार्य कारणा शिवाय कोणालाही जिल्हयाची सीमा ओलांडून येता किंवा जाता येणार नाही. आपले नातेवाईक कुठे अडकले असतील तर त्यांना थोडे दिवस थांबायला सांगा चोरून कोणी गावात येत असेल तर त्यांना गावात प्रवेश देऊ नका तातडीने प्रशासनाना कळावावे.नवीन जीवनशैलीची सवय करून घ्या कोविड-१९ युध्द जिंकायचे असेल तर  त्याची लागण झालेल्याच्या संपर्कात न येणे हेच त्यासाठी प्रभावी आस्त्र आहे  असे सांगून पालकमंत्री देशमुख म्हणाले की, गाव सुरक्षित राखण्यासाठी आजवर ज्या योध्दयांनी परिश्रम घेतले आहेत त्यां योद्ध्यांनी स्वत:ही सुरक्षित रहाणे गरजेचे आहे. या काळात त्यांनी  सॅनिटायझर, मास्क या सुरक्षा साधनांचा वापर करायचा आहे. घरी किंवा गावात सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असलेला व्यक्तिला दिसून आल्यास त्यास ताबडतोब रूग्णालयात नेऊन तपासायचे आहे कोविड-१९ पासून सुरक्षित रहाण्यासाठी आरोग्य विभागाने जी मानांकने ठरवुन दिली आहेत त्यांचा आवलंब करायचा आहे. एकदरीत नवीन जीवनशैली अवलंबायची आहे. 
 शेती व शेतीशी निगडीत उदयोग, व्यवसायाची कामे सुरू करा
लॉकडाऊन २ मध्ये ग्रामिण भागासाठी काही नियम शिथीलही केले आहेत त्यानुसार आता शेतीची सर्व कामे सुरू करायची आहेत. रोजगार हमी, जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करायची आहेत. महापालीका, नगरपालीका, नगरपंचायती हददी बाहेरील रस्ते, सिंचन या संबंधीच्या बांधकामांना परवानगी दिली आहे. मात्र हे करीत असतांना संबंधित विभागाची रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. 
 टंचाई निवारणाच्या कामना प्राधान्य द्यावे
उन्हाळा वाढत असल्यामुळे काही टंचाई निवारणाची कामे करावी लागणार आहेत. यामध्ये पाणीटंचाई, विजपुरवठा या कामाला प्राधान्य देण्याच्या सुचना दिल्या आहेत. आगामी काळात खरीप मशागतीची कामे सुरू होतील त्यमुळे खते, बियाणे यांचा तुटवडा निर्माण होणार नाही यावरही आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन अहोत. लॉकडाऊन- २ मधुन बाहेत पडतांना आपणाला आर्थिक संकटाशी सामना करावा लागणार आहे. त्या दृष्टीनेही आता पासूनच काळजी घेतली जात आहे असे सांगून सर्व ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती, जिल्हापरीषद सदस्य, इतर संस्थाचे पदाधिकारी, गावागावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकसंघ होऊन कोविड-१९ चा पराभव करण्यासाठी योगदान दयावे. येणाऱ्या संभाव्या परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी पूवर्तयारी करून सज्ज रहावे असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.या टेलीकॉन्फन्सिंगमध्ये लक्ष्मीबाई वाघमारे, सुभाष जाधव, प्रकाश ऊफाडे, बबन ढगे, सज्जन लोनाळे, गणेश ढगे, गोपिनाथ खताळ, दादाराव पवार, अनिल पाटील यांच्यासह अनेकांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे गावातील व परिसरातील समस्या मांडल्या त्या सर्व समस्या सोडविण्याचे पालकमंत्री देशमुख यांनी  आश्वासन दिले.


Post a Comment

0 Comments