Latest News

6/recent/ticker-posts

कोरोनाने दगावलेल्या रुग्णाचे दोन लाखाचे बिल वळविले एमपीजेए योजनेत

कोरोनाने दगावलेल्या रुग्णाचे दोन लाखाचे बिल वळविले एमपीजेए योजनेत



रुग्णाच्या नातेवाईकांनी मानले पत्रकार कांतीलाल कडू यांचे आभार


पनवेल:(प्रतिनिधी) कोरोना बाधित रुग्णाच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर आज सकाळी कोरोनाने त्याचे निधन झाले. रुग्णालयाने नातेवाईकांच्या हातावर दोन लाख रुपयांचे बिल ठेवले. आधीच कुटुंबप्रमुखाचा मृत्यू आणि हॉस्पिटलचे बिल पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण काही क्षणातच सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू मदतीला धावले आणि त्यांनी बिलाची संपूर्ण रक्कम महात्मा फुले जन आरोग्य योजनेत वळती केली. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला. 


कर्नाळा विभागातील एका कोविड रुग्णाला कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया काल करण्यात आली होती. कोविडच्या अति प्रादुर्भावामुळे तब्येत खालावत गेली आणि आज सकाळीच त्यांचा मृत्यु ओढावला.


कुटुंबप्रमुख गेल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यात रूग्णालयाचे बिल दोन लाखाचे झाले होते.


आता करायचे काय? असा यक्षप्रश्न समोर उभा राहिला. त्या क्षणी त्यांच्या एका नातेवाईकाने पनवेल संघर्ष समितीचे नेरे विभागीय अध्यक्ष सचिन पाटील यांना फोन केला. त्यांना हकिगत सांगितल्यानंतर पाटील यांनी कडू यांच्याशी संपर्क साधला. बिलाच्या रकमेत काही तरी सवलत मिळावी, अशी नातेवाईकांची अपेक्षा असल्याचे सांगितले. पत्रकार कडू यांनी ताबडतोब रुग्णाच्या नातेवाईकांना बोलायला सांगितले. वस्तुस्थिती समजून घेतली. हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून खर्च घेण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितले. 


प्रशासनाने होकार देताच घेतलेल्या जबाबदारीनुसार कडू यांनी योजनेचे रायगड परिक्षेत्र अधिकारी डॉ. वैभव गायकवाड यांच्याशी संपर्क साधून योजनेची आवश्यक ती पूर्तता करण्यास सांगितले. तिकडून हिरवा कंदिल मिळताच हॉस्पिटलने बिलाची सर्व रक्कम योजनेत वळती केली. त्यामुळे रुग्णाला एकही रुपया खर्च करावा लागला नाही. कांतीलाल कडू यांच्या प्रयत्नाने दोन लाखाचे बिल योजनेत वळते करण्यात आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी कडू यांचे आभार मानले आहेत.


Post a Comment

0 Comments