१७७ झाडांचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा
फुग्यांची सजावट, मिठाई वाटून आनंदोत्सव; झाडे लावा, झाडे जगवा दिला संदेश
लोकसहभागाची चळवळ: वसुंधरा प्रतिष्ठान, जनसेवक ग्रुपच्या पुढाकाराने 'हरित प्रभाग संकल्पना' प्रत्यक्षात
लातूर:(प्रतिनिधी) येथील वसुंधरा प्रतिष्ठान आणि जनसेवक ग्रुप यांच्या वतीने २०१९ मध्ये लावण्यात आलेल्या झाडांचा पहिला वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. झाडांना फुग्यांची सजावट करून मिठाई वाटण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन काळाची गरज हा संदेश देण्यात आला. वसुंधरा प्रतिष्ठान, जनसेवक ग्रुप, लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ मध्ये प्रभाग १४ मध्ये २०० पर्यावरण पूरक झाड लावण्यात आली. त्यातील १७७ झाड जगविण्यात आली असून या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. झाडे लावण्यापेक्षा झाडे जगविण्याकडे अधिक भर असल्याची माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा यांनी दिली. प्रभागात लावण्यात आलेल्या झाडांना ट्री गार्ड बसविण्यात आल्याने वृक्ष संवर्धन शक्य झाले आहे. भागातील नागरिकांना प्रत्येकी २ झाड दत्तक देण्यात आली होती, नागरिकांनी आपल्या लेकराप्रमाणे झाडांचे संवर्धन करून एक आदर्श निर्माण केला आहे. झाडांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाय, प्रभागात लावण्यात आलेल्या झाडांची नाव अंतर्गत मार्गाना देण्यात आली आहेत. प्रभागातील सद्गुरू नगर, गुलटेकडी भाग, दादोजी कोंडदेव नगर, राधाकृष्ण नगर, लक्ष्मी कॉलनीचे रस्ते झाडांनी हरित झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षीही प्रभागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत असून, प्रत्येक झाडास संरक्षण साठी ट्री गार्ड बसविण्यात येत आहेत. झाडांचा वाढदिवस ही संकल्पना अनेकांसाठी नवखी आहे. मात्र, या संकल्पनेची सुरुवात सर्वप्रथम वसुंधरा प्रतिष्ठानच्या २०१६ मध्ये सुरू केली. आज अनेकजण झाडांचा वाढदिवस साजरा करत असून, ही संकल्पना अनेकजण राबवत आहेत. कोरोना असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवाय, वृक्ष संवर्धन बद्दल नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, जनसेवक ग्रुपचे किशोर जाधव, रोहित पवार, संतोष धानुरे, अविनाश कुलकर्णी, संभाजी मगर, विजय जाधव, रजनीकांत जाधव, मारुती हल्लाळे, सोमनाथ पांचाळ, प्रशांत सातपुते, प्रवीण पवार, धनंजय मुंडे उपस्थित होते.
0 Comments