कोरोनाला हरविण्यासाठी देत आहेत 'योग प्राणायाम' प्रशिक्षण
योग प्रशिक्षक सुरेंद्र वालेसह कुटुंबीय व संतोष राठोड यांचा धाडसी पुढाकार
आर्या वाले हि एक धनुर्विध्या क्रीडा प्रकारातील सुवर्णपदक विजेती राष्ट्रीय धनुर्धर आहे, सध्या आर्या कोविड योद्ध्याचे कार्य करत आहे. समाजाचे काहीतरी देणे असून सामाजिक बांधिलकी म्हणून आई सोबत आर्या कोविड केंद्रावरील मुली व महिला रुग्णांना योग प्राणायामाचे नियमित प्रशिक्षण देत आहे, तिने घेतलेल्या या धाडसी पावलाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे
उस्मानाबाद:(प्रतिनिधी) जगभरात कोरोना विषाणूंचा थैमान चालूच आहे, यात उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढतच आहे, कोरोना झाला म्हणजे सगळेच गंभीर होतात. यातच योग्य उपचार घेऊन कोविड केंद्रातून बरे होऊन घरी जाणारेही सर्वाधिक आहेत. असाच एक सुखद अनुभव सध्या उमरगा शहरात येत आहे. उस्मानाबाद जिल्हा योग संघटनेचे सचिव योग प्रशिक्षक सुरेंद्र वाले, पत्नी अर्चना वाले, मुलगी आर्या वाले व मित्र योगशिक्षक संतोष राठोड आदींच्या टीमने धाडसी पुढाकार घेतला आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जिल्हा योग संघटनेच्या सहकार्याने ते सध्या रोज सकाळी कोविड केंद्रावर योग प्राणायामाचे प्रशिक्षण देत आहेत.
उमरगा शहरातील ईदगाह मैदान कोविड केंद्रावर योग प्रशिक्षक सुरेंद्र वाले, अर्चना वाले, आर्या वाले व संतोष राठोड हे मागील २ महिन्यापासून विलगीकरण कक्षातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसह कोविड पॉसिटीव्ह रुग्णावर त्यांच्या क्षमतेनुसार योग व प्राणायामाचे धडे सकाळच्या सत्रात ७.०० ते ८.०० वेळेत देत आहेत. रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य वाढविणे, आनंद देणे, नैराश्य घालविणे, शारीरिक व मानसिक संतुलन वाढविण्याच्या हेतूने या प्रशिक्षणाचा आधार दिला जात आहे, यामुळे रुग्णामधील भीतीदायक वातावरण कमी होण्यास मदत मिळत आहे. योग प्राणायामामुळे श्वसनाचा व्यायाम उत्तमप्रकारे होत असून जागृतीही होत आहे. या प्रशिक्षणामुळे रुग्णांचे मनोबल वाढत असून त्याचा सकारात्मक परिणाम रुग्णावर दिसत आहे. लहान मुलासह, तरुण व वयस्कर रुग्ण यात नियमित सहभागी होत आहेत. रुग्णांना नवीन ऊर्जा मिळत असल्याचेही प्रत्यक्ष रुग्णातून सांगण्यात येत आत आहे.
एकंदरीत योग प्राणायाम प्रशिक्षणामुळे फुफ्फुसाची गतिमानता वाढविण्यास मदत होत असून हृदयाची कार्यक्षमता, श्वसनासंबंधी ऊर्जा व आनंदी वातावरण निर्माण होत आहे.
'कोरोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे, अशावेळी रुग्णामधील शारीरिक मानसिक संतुलन वाढवून त्यांच्यामधील सकारात्मकता वाढणे आवश्यक आहे, योग प्राणायामामुळे रुग्णांची रोग प्रतिकारक शक्तीही वाढणार आहे. येथील यशस्वीतेनंतर जिल्ह्यात इतर केंद्रावरही प्रशिक्षण चालू करण्यात येत असून यास चांगला प्रतिसादही मिळत आहे.
-डॉ गजानन परळीकर, जिल्हा आयुष अधिकारी, उस्मानाबाद
कोरोना विषाणू रुग्णांच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे हे महत्वाचे लक्षण आढळते, योग प्राणायामामुळे फुफुसांना सक्षम बनविण्यास मदत होते, योगासनाबरोबर अनुलोम विलोम, सूर्यभेदन, भसरिका, कपालभाती आदींसारख्या प्राणायामामुळे फुफ्फुसे मजबूत आणि कार्यक्षम बनतात.
-योगप्रशिक्षक सुरेंद्र वाले, सचिव उस्मानाबाद जिल्हा योग संघटना
0 Comments