काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली;चाकुर तालुक्यातुन जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी व्हर्चुअल सभेत सहभागी व्हावे
विलासराव पाटील चाकुरकर चाकुर तालुका अध्यक्ष कॉग्रेस पार्टी यांनी केले अहवान
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) दि. १५ ऑक्टोबर २०२० लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून या संघर्षाच्या पुढच्या टप्प्यात गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले असून राज्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी काँग्रेस नेते १० हजार गावातील ५० लाख शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. आपल्या न्याय हक्काच्या या लढाईत शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी आणि कामगार कायदे आणून मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे. महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी- #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम राबविण्यात आली होती. २८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवेदन देऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी केली होती. तर २ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन व मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनाचा पुढचा टप्प्यात गुरुवारी १५ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता शेतकरी बचाओ रॅली व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बचाव रॅलीचा कार्यक्रम राज्यातील सहा ठिकाणांहून एकाच वेळी होणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटर कनेक्ट असून सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. औरंगाबाद येथील कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बस्वराज पाटील मरुमकर उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये LED Screen, LCD प्रोजेक्टर स्क्रीन, टीव्ही, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून या व्हर्चुअल सभांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या म्हणजेच INCMaharashtra च्या facebook.com/incmaharashtra , twitter.com/incmaharashtra , youtube.com/incmaharashtra या फेसबुक, ट्वीटर युट्युब, वरून या शेतकरी बचाओ मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
0 Comments