श्री सद्गुरू हावगीस्वामी मठात प्रकाशाचा संदेश
उदगीर:(प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री सद्गुरू हावगीस्वामी यात्रा चालू आहे. यानिमित्त मठात दररोज भक्तमंडळी करिता प्रवचन चालू असते. आज राष्ट्रीय एकात्मतेचं उत्तम उदाहरण मठात पाहायला मिळाले. जमाते इस्लामी हिंद शाखा उदगीर तर्फे "अंधारातून प्रकाशाकडे" राबविल्या जाणाऱ्या राज्यव्यापी अभियानांतर्गत भक्तमंडळी समोर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. मोमीन मुजीब यांनी सांगितले की सार्या विश्वातील मानव आपापसात बंधू आहेत. पृथ्वीचा पहिला पुरुष व स्त्री, सा-या मानवांचे आजी आजोबा आहेत. ही जाण ठेवून आपण आपापसात बंधुभावाने रहावे. आज विश्व भौतिक दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेला आहे, परंतु त्याच प्रमाणात नैतिक अधःपतन ही झालेले आहे. अज्ञान, अत्याचार, दुर्व्यवहार, निंदा, टवाळखोरी, मार्गभ्रमता, मार्गभ्रष्टता, दुराचार, अश्लीलता, नग्नता, स्त्रीभ्रणहत्या, द्वेष, घृणा, आई-वडील व मोठ्यांचा अनादर, चंगळवाद, पाश्चिमात्य संस्कृतीचा अंधानुकरण असा अंधार सर्वत्र पसरलेला आहे. या अंधारातून दुर जाण्याचा मार्गही उपलब्ध आहे. सृष्टीचा निर्माता, रचयिता, पालनकर्त्याने मानवी जीवनाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक काळात आपले संदेशवाहक पाठवले. त्यांनी मानवाला सत्य मार्ग सांगितला. याच संदेशवहनातील अंतिम संदेशवाहक पैगंबर मुहम्मद (स.) आहेत. त्यांच्यावर पवित्र कुरआनचा प्रकाश अवतरीत झाला. आज तो सर्व भाषेत पूर्णपणे सुरक्षित उपलब्ध आहे. हा संदेश सर्वाकरीता आहे. हा प्रकाश आम्हाला अंधारातून काढून उज्वल मार्गाकडे घेऊन जाईल. या कुरआनने मानवात उत्तरदायित्वाची भावना रुजविली. आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा जाब आपल्या निर्माणकर्त्याला द्यावा लागेल. आपण येथे सत्कर्म करावे व दुष्कर्मापासून दूर राहावे असा संदेश दिला. या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येत भगिनी व बंधू उपस्थित होते. डॉक्टर शेख असगर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेवटी सद्गुरु श्री शंभू महाराजांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले व या संदेशाची आवश्यकता असल्याचे सांगितले. जमाअत-ए-इस्लामी शहरात अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम राबवून प्रेम बंधुभाव सलोखा व मानवी एकता वाढवण्याचे काम करीत आहे.

0 Comments