अभाविप तर्फे महाविद्यालये सुरु करण्यासाठी राज्यसरकार विरोधात आंदोलन
लातूर:{ प्रतिनिधी } अखिल भारतीय विद्यार्थी परीषद लातूर शाखेतर्फे दयानंद महाविद्यालय व स्वा.रा.ति.म.विद्यापीठ उपकेंद्र येथे आंदोलन करण्यात आले. राज्यसरकारने सर्व महाविद्यालय व विद्यापीठे सुरु करावीत, यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. राज्यामध्ये कोरोना परीस्थिती नंतर सर्व मंदिरे, शाळा, रेल्वे, मद्यालये नियमित सुरु करण्यात आले आहेत. पण अजुनही सर्व वरिष्ठ महाविद्यालय बंदच आहेत. अनेकदा निवेदने देऊनही महाविद्यालये सुरु करण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही, म्हणून राज्यशासनाला जाग आणण्यासाठी अभाविप तर्फे आंदोलन करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येत्या मार्च महिन्यापासून अनेक विद्याशाखांच्या परीक्षा सुरु होणार आहेत. तरी महाराष्ट्र शासन अजूनही महाविद्यालय सुरु करण्याचा विचार करत नाही. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी महाविद्यालय सुरु करण्याची मागणी केली होती. अनेक विद्यापीठांनी त्यांच्या बैठकांमध्ये महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रस्ताव पारित करून राज्य शासनाला पाठवले आहेत.
विद्यापीठाने दर्शवलेल्या तयारीवर देखील महाविकास आघाडी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. म्हणून अभाविप लातूर शाखेतर्फे लातूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्रवेश द्वारावर आंदोलन करण्यात आले. यादरम्यान पोलिसांकडून अटक व तात्काळ सुटका करण्यात आली. यावेळी अभाविप लातूर जिल्हा संयोजक पवन बेळ्कोने, महानगर मंत्री प्राजक्ता भोसले, प्रसाद मुदगले, प्रणव नागराळे, विश्वजीत पाटील, वैष्णवी कुलकर्णी व कृष्णा बिराजदार यांनी विद्यार्थ्याना संबोधित केले. यावेळी अभाविप लातूरचे कार्यकर्ते व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments