लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या 14 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
लातूर: बस ऑपरेटर कॉन्फिडरेशन ऑफ इंडियाशी संलग्नित लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या तब्बल 14 पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने असोसिएशनच्या सभासदामध्ये खळबळ माजली आहे. आज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल देशपांडे यांच्याकडे हे राजीनामे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख काशिनाथअप्पा बळवंते यांनी दिली आहे. राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये असोसिएशनचे सचिव, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सल्लागार या महत्वपूर्ण पदाधिकारी यांचा समावेश आहे.
असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारास कंटाळून आम्ही सामूहिक राजीनामा देण्याचे ठरवले अशी माहिती सचिव विश्वास शिंदे यांनी दिली. तर ही घटना दुर्दैवी असून संवाद आणि सामोपचाराने हा प्रश्न निकाली काढता आला असता, खाजगी प्रवासी वाहतुकदारांच्या न्याय हक्क आणि समस्या सोडविण्यासाठी असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा प्रसिद्धी प्रमुख काशिनाथअप्पा बळवंते यांनी व्यक्त केली आहे.


0 Comments