कलाकृतीतुन उमटणारे दु:ख परिवर्तनाला चालना देणारे असते- डॉ. भगवान दिरंगे
(बाबुराव आगलावे)
ग्रामीण जीवनातील सर्वसामान्य माणसांची होणारी ससेहोलपट आणि व्यवस्थेमुळे वाट्याला आलेले दुःख ' हूरहूर ' कथासंग्रहातून प्रतिबिंबित झाले आहे. अनेकदा कलाकृतीतून उमटणारे दुःख परिवर्तनाला चालना देणारे असते"असे प्रतिपादन परतूर येथील प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे यांनी केले. औरंगाबाद येथील शब्दभूमी पब्लिकेशन च्या वतीने स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय मंठा येथे ( ता.१) सोमवार रोजी सकाळी ११वाजता, प्रा.छबुराव भांडवलकर यांच्या ' हूरहूर ' कथासंग्रहाचे प्रकाशन परतूरचे माजी प्राचार्य डाॅ. भगवान दिरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.भारत खंदारे, प्रा.डॉ. सदाशिव कमळकर, प्रा. प्रदीप देशमुख, लेखक प्रा. छबुराव भांडवलकर, शब्दभूमी पब्लिकेशनचे प्रकाशक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. भगवान दिरंगे म्हणाले की, घरातील टी.व्ही. आणि हातातील मोबाईल यामुळे वाचनसंस्कृतीला खीळ बसली असून ग्रामीण साहित्याच्या निर्मितीची प्रक्रिया थंडावली आहे. अशा परिस्थितीत भांडवलकर यांचा कथासंग्रह अस्सल ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारा वाटतो. त्यांच्या भाषेवर येथील संतांच्या भाषेचे संस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. हूरहूर चे कथाकार भांडवलकर यांच्या साहित्यावर बोलताना प्रा.कमळकर म्हणाले की, ग्रामीण जीवनाचं वास्तव भांडवलकर यांच्या प्रत्येक कलाकृतीतून व्यक्त होताना दिसते. त्यांच्या 'उमनी', 'थेट सरपंच' या कादंबरीतून ग्रामीण भागातील समाजकारण आणि राजकारण प्रभावीपणे चित्रित झाले असून 'उभारी' सारख्या कादंबरीतून त्यांनी ग्रामसंस्कृतीत जगणाऱ्या माणसाचा आशावाद मांडला आहे. त्यांच्या पुस्तकाची भाषा साधी सरळ आणि मनाला भिडणारी असून व्यवस्थेतून येणारी विदारकता मांडणारी आहे. शब्दभूमी पब्लिकेशच्या वतीने प्रकाशन करण्यात आलेल्या 'हूरहूर' कथासंग्रहावर भाष्य करताना प्रा.प्रदीप देशमुख म्हणाले की, भांडवलकर यांचा कथासंग्रह ग्रामीण जीवनातील बकाल अवस्था मांडणारा दस्तऐवज आहे. दुष्काळ, स्थलांतर, व्यसनाधिनता आणि एकूण सामाजिक व राजकीय स्थित्यंतराचे ग्रामीण जीवनावर होणारे परिणाम शब्दबद्ध झाले आहेत. त्यांच्या कथेतील पात्रे सर्वसामान्य, शेतकरी आणि वंचित वर्गातील असून त्यांच्या वाट्याला आलेली परवड अधोरेखित करणारी आहे. यावेळी लेखक भांडवलकर यांनी कथा आणि कादंबरीतील आपली पात्रे जिवंत असून आपल्या मनाची अस्वस्थता व्यक्त करण्यासाठीच आपण लिहिते झाल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.भारत खंदारे म्हणाले की, आज नेटवर्किंगने आपले संपूर्ण जीवन व्यापून टाकले असून याचा परिणाम संपूर्ण समाज घटकांवर होत आहे. कथासंग्रहातून अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन होत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी निशिगंधा मानवतकर हिचा (मास्टर ऑफ जर्नालिझम) एम.जे परीक्षेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विभागात तिसरी येण्याचा मान मिळवल्याबद्दल आविष्कार साहित्य मंडळाकडून सत्कार करण्यात आला.
प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक परतूरचे लाल बहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.सुधाकर जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पांडुरंग नवल यांनी केले, तर शब्दभूमी पब्लिकेशनचे प्रकाशक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी प्राचार्य अंकुशराव मोरे नाना, प्रा. डाॅ.वाय.बी वायकर, प्रा. डाॅ.यशवंत दुबाले, प्रा.डॉ.बापू सरवदे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक खरात, प्रा. डाॅ.डी.बी महाजन, प्रा. डाॅ.वामन वैद्य, प्रा.चारुलता पाटील, प्रा.अच्युत मगर प्रा. डाॅ.राजेंद्र काकडे, प्रा.डाॅ. जिंतेन्द्र जगताप, प्रा.डाॅ. के.आर. गहिलोद, प्रा.डाॅ. राजेंद्र उढाण, प्रा. डाॅ. तुषार धोंडगे,प्रा.डाॅ. राजेश गायकवाड, प्रा.भाऊसाहेब आवटे नाना, प्रा.डाॅ. रविंद्र गायके, आविष्कार साहित्य मंडळाचे पदाधिकारी विवेक सोनटक्के, डाॅ.संतोष मोरे, द वर्ल्ड इंग्लिश स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजी जाधव, ओमप्रकाश राठोड, सौ.लक्ष्मीबाई भांडवलकर, सौ.सुमती धों.मानवतकर, कवी, कथाकार शिरीष देशमुख, डॉ. गोपाल तुपकर, यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्य रसिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण भांडवलकर, विक्रम भांडवलकर, खरात यांनी परिश्रम घेतले.

0 Comments