राष्ट्रीयकृत बँकाच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प;खासगीकरनाच्या निषेधार्थ कर्मचारी संपावर
बी डी उबाळे
औसा: केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरातील बँका कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर आहेत. राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी देशातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं सर्वोच्च हत्यार उपसलं आहे. यामुळे सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच 15 आणि 16 मार्च 2021रोजी संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे औसा तालुक्यातील देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी बँका बंद आहेत. या संपाचा सामान्य माणासाच्या आणि विध्यार्थी,व्यापारी,उद्योजक,शासकीय कामकाज आदींच्या दैनिक व्यवहार आणि मानवी जीवनावर परिणाम होत आहे.या संपाचा बँकिंग सुविधांवरही मोठा परिणाम होऊ शकतो.संपामुळे चेक क्लीअरन्स किंवा लोन मंजुरी, लोन रिकव्हरी, हप्ते आदी सारख्या सुविधांना अडचण येऊ शकते. सोमवारी मंगळवारी बँका बंद असल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय होणार आहे. या संपात महाराष्ट्रातील तब्बल दहा हजाराहून जास्त शाखेतील कर्मचारी सहभागी होणार असल्याचे समजते. बँकांकडून संपाबाबत ग्राहकांना पूर्वकल्पना दरम्यान, स्टेट बँकेसह इतर बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत आधीच माहिती दिली होती.कर्मचाऱ्यांचा जर संप होईल तर त्याचा बँकेच्या कामकाजांवर परिणाम होईल. बँकेच्या प्रत्येक शाखेतील कामकाजावर त्याचा प्रभाव पडेल, असं ग्राहकांना आधीच सूचित करण्यात आले आहे. तसेच कामकाज सुरळीत चालावे यासाठी योग्य पावलं उचलू, असं आश्वासन बँकांकडून देण्यात आले आहे. या यूनियनमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटना सहभागी आहेत. दोन दिवसीय संपात देशभरातील जवळपास 10 लाख कर्मचारी संपावर जातील, असा दावा युनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियनने केला आहे. दोन बँकांचं विलगीकरण होणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केलं तेव्हा देशातील दोन बँकांचं खासगीकरण केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. देशात सध्या 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत.यापैकी दोन बँकांचं खासगीकरण केलं तर देशात फक्त दहा बँक सरकारी राहतील.विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात 14 सार्वजनिक बँकांचं विलनीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामध्ये औसा येथील राष्ट्रीयकृत शाखा बंद असल्याने अनेक ग्राहक येथे फिरकताना आणि चौकशी करताना दिसत होते.

0 Comments