Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर तहसीलमध्ये मनसे चे ठिय्या आंदोलन

चाकूर तहसीलमध्ये मनसे चे ठिय्या आंदोलन


जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी धरले महावितरण अभियंत्याला धारेवर

चाकूर:(तालुका प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी) आज चाकूर तहसील मध्ये मनसेने शेतकऱ्यांची विजतोडणी विषयी व पीकविमा वाटपाविषयी जाब विचारण्यासाठी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या उपस्थितीत महावितरण अभियंता ए. आर. अडगूबे आणि कृषी अधिकारी भूजंग पवार,विमा अधिकारी संतोष भोसले यांना पाचारण केले होते.त्या ठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.चाकूर तालुक्यातील 26 गावी महावितरण ने कुठलीही नोटीस न देता विजतोडणी केली आहे.नियमाने वीज तोडणी करण्याअगोदर पंधरा दिवस संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देणे गरजेचे आहे.परंतु महावितरण कायदा मोडून महादादागिरी करत गावची गाव अंधारात ढकलत आहे त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.तसेच यावर्षी रब्बी जोरात असताना पिकाला विजतोडणी झाल्यामुळे पाणी कमी पडून पिके कोलमडते आहेत. त्यातच अनेक गावी ट्रान्सफॉर्मर जाळले आहे तेसुद्धा 48 तासात देणे बंधनकारक असतानाही महावितरण वेळेवर देत नाही. तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारा, डीपी,धोखाकदायकरित्या जमिनीवर व उघडे पडले आहेत तिथेही महावितरण साधे मेंटेनन्स करत नाही यामुळे शेतकऱ्यांचा जीव जात आहे,ऊसाची शेते जळत आहेत.तसेच पीकविमा का जाहीर झाला नाही याचा जाब ही कृषिअधिकाऱ्यांना व विमाकंपनी अधिकाऱ्याला मनसेने विचारत तो लवकरात लवकर जाहीर नाही झाला तर अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला. शेवटी तहसीलदार डॉ बिडवे यांच्या मध्यस्ती नंतर मनसेने ठिय्या आंदोलन थांबवले परंतु लेखी अश्वासनाशिवाय उठणार नाही अशी भूमिका मनसेने घेतल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचा हंगाम चालू असताना जर महावितरण ने परत विजतोडणी केली तर यानंतर तुमच्या तोंडाला काळे फासून गावभर धिंड काढू असा सज्जड दम जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी अभियंत्याला दिला. महावितरण या नंतर सूडबुद्धीने नाही तर सद्बुद्धी ने वागेल असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.तसेच कालावधी उलटून गेला तरी पीकविमा का वाटप न होण्याचे कारण पीकविमा कंपनी चे खोटे पंचनामे असून कंपनी ने शासनाने केलेले पंचनामे गृहीत धरून त्वरित पीकविमा वाटप करा असे कृषी व विमाकंपनी अधिकाऱ्यांना डॉ भिकाणे यांनी सांगितले.

यावेळी कृषितालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,शहराध्यक्ष अजय धनेश्वर,तुळशीदास माने,मारुती पाटील,शंकर पाटील,बालाजी कोठावळे,जगन्नाथ चाटे,ज्ञानोबा काचे,दगडू शेवाळे,बळीराम जगदाळे, निळकंठ होणराव, विलास शेवाळे,किशोर स्वामी,राहुल अरडवड, नंदू सुडे,कृष्णा बेंबडे,धोंडीराम भंडारे,बाळू सूर्यवंशी, हनुमंत पास्तापुरे,माधव कोंबडे,विष्णू बोंबडे, बाळू बचपल्ले,राम सुडे,माधव बिडवे,धनंजय बेडदे, मुकुंद सोनवणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments