ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे– महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे आवाहन
लातूर:(प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्यामुळे समाजातील विविध घटक भविष्यात संकटात सापडणार आहेत.हे आरक्षण वाचविण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर लातूर येथे आयोजित व्यापक बैठकीत महापौर गोजमगुंडे बोलत होते.या बैठकीस ॲड. अण्णाराव पाटील,मनपातील सभागृहनेते शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक आयुब मणियार,अजित निंबाळकर, काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ पाटील, ॲड.गोपाळ बुरबुरे,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश खटके, मनसेचे अध्यक्ष किरण चव्हाण,समता परिषदेचे अध्यक्ष पद्माकर वाघमारे, रघुनाथ मदने, ओबिसी आघाडीचे अध्यक्ष सुरज राजे, दशनाम आखाड्याचे अध्यक्ष व्यंकटेश पुरी,प्रा. अनंत चौधरी,नामदेव इगे, राम गोरड,विशाल देवकते, डॉ विद्या जामकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ओबीसी आरक्षणासंदर्भात आपले मत मांडताना महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की,राजकीय आरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.हे आरक्षण असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व मिळत आहे.आरक्षण नसते तर नगरसेवक,सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यपद मिळाले नसते.समाजातील एका व्यक्तीला पद मिळाले तर त्या समाजातील हजारो व्यक्तींना लाभ होतो. आरक्षणामुळे समाज प्रगतीच्या वाटेवर चालू लागला आहे. हे आरक्षण रद्द झाले तर समाजाची मोठी हानी होणार आहे.यासाठी आरक्षण टिकण्याची गरज आहे.सर्वोच्च न्यायालयाने अद्यापही आरक्षण रद्द केलेले नाही तर त्याचा इम्पेरियल डाटा मागवलेला आहे. सरकारने हा डाटा लवकरात लवकर न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे,असेही ते म्हणाले. महापौर गोजमगुंडे म्हणाले की,आरक्षण टिकावे यासाठी केवळ ओबीसी या एकाच तत्वावर एकत्र येणे आवश्यक आहे.जातपात बाजूला ठेवून पक्षाचे झेंडे व त्यासोबत असणारे रंग विसरून जात फक्त ओबीसी जगला पाहिजे,ओबीसी वाचला पाहिजे या भावनेतून काम करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याची शक्ती कुठल्याही सरकारमध्ये नाही.ओबीसी समाज एकजूट होऊन समोर आला तर त्याची ताकद दिसून येते.ही ताकद सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आपण एकत्रित येऊन लढा देऊ.या लढ्यात तन-मन-धनाने आपण समाजासोबत आहोत.जी जबाबदारी आपल्यावर सोपवली जाईल ती पार पाडण्यास आपण तयार आहोत असे प्रतिपादन महापौर गोजमगुंडे यांनी केले.
तर नोकऱ्या आणि शिक्षणातील अरक्षणासही मुकावे लागेल राजकीय आरक्षण न टिकल्यास राज्यकर्त्यांवरील दबाव कमी होईल पर्यायाने भविष्यात नोकऱ्या आणि शिक्षणातील अरक्षणासही ओबीसींना मुकावे लागेल. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत लढा उभारणे गरजेचे आहे,असे महापौर म्हणाले.

0 Comments