Latest News

6/recent/ticker-posts

लेख:--> कृषी खाते अश्या शेतकऱ्याकडे लक्ष देईल का?

 ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...

कृषी खाते अश्या शेतकऱ्याकडे लक्ष देईल का?


कृषीचे सगळे पुरस्कार या शेतकऱ्याला द्या...

शेतकरी हा कष्टकरीच असतो हे आता नव्याने सांगायची गरज नाही..त्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो,बँका गलेलठ्ठ उद्योगपतींना पैसे देतात आणि कष्टकरी शेतकऱ्यांना चकरा मारायला लावतात..तरीही शेतकरी बँका बुडवत नाहीत.. कष्टाने मिळालेल्या पैशातून बँकांचे पै पै फेडण्याचा प्रयत्न करतात..कर्जबाजारी होतात,जीवन संपवतात पण बँकांना कधीच संपवत नाहीत..सरकार कोट्यवधींचे बजेट बनवते पण ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जाते याचे गौडबंगाल काही आजपर्यंत कळले नाही..काही पुरस्कार दिले जातात,तेही नेमके कुणाच्या नशिबात असतात हेही गुलदस्त्यात आहे..मध्यंतरी एका कृषी अधिकाऱ्याचा फोटो फेसबुकवर आला होता..हे महाशय शेतात फळबाग लागवडचे उदघाटन करण्यासाठी शेतात गेले..आदल्या दिवशी पाऊस पडला आणि साहेबांची तारांबळ उडाली..त्यांच्या चमच्यांनी शेतकऱ्यांना आदेश दिले,तिथे मॅट टाका,कारण साहेबांच्या पायाला चिखल लागता कामा नये..याला कृषी अधिकारी कोण केला हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला..जर पायाला काळी माती लागु द्यायची नाही तर याला फळबाग लागवड करायला बोलवलेच कशाला..सगळा फार्स सुरू आहे.. इतकं सगळं यासाठी सांगतोय की,माझ्या एका दीपक पाटील भराड नावाच्या फेसबुक मित्राने काही दिवसांपूर्वी एक फोटो टाकला होता,तो पुन्हा माझ्या पाहण्यात आला..चाळीसगाव मधील खडकी इथल्या विठोबा मांडोळे या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याने,आणि त्याच्याकडे बैलजोडी घ्यायला पैसे नसल्याने त्याने घरातील बाज आणून त्याच्या साहाय्याने शेतात कापूस लागवडीसाठी सऱ्या सोडल्या आणि तीन एकरवर त्यांनी बाजेच्या साहाय्याने मेहनत केली..दारिद्र्य ही शेतकऱ्याची संपत्ती आज की काय असे वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे..सगळे पुरस्कार अश्या शेतकऱ्यांच्या पायावर टाकले पाहिजेत..घरात बैल नाहीत म्हणून नवरा बायको औत ओढताना अनेक शेतकरी दिसतात त्यांच्या पायावर असे पुरस्कार आणि त्याच्या रकमा पडायला हव्यात..काही काही शेतकरी परिस्थिती नसल्याने फळबागा डोक्यावर पाण्याचे हांडे नेऊन जागवत असतात,तिथे हे पुरस्कार पोचायला हवेत.. अश्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरी आर्थिक क्रांती घडवण्यासाठी पुढाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. कृषी खाते अश्या शेतकऱ्याकडे लक्ष देईल का?


संजय जेवरीकर,लातूर

भ्रमणध्वनी: 7887307789

Post a Comment

0 Comments