डासांमार्फत पसरणाऱ्या आजारासंदर्भात जनतेनी घ्यावयाची काळजी
लातूर:(जिमाका) दि. 27 - राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत किटकामार्फत विशेषत: डासांमार्फत प्रसार होणाऱ्या हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या, हत्तीरोग, जे.ई.अशा रोगांच्या नियंत्रणासाठी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नियमित विविध उपाययोजना करण्यात येतात. या रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावरुन नागरिकांचे सक्रीय सहभाग अपेक्षित आहे. जेणेकरुन या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. रोग प्रसारक डास व त्याची उत्तपत्ती डासांच्या जीवनचक्रामध्ये चार अवस्था (अंडी,अळी,कोष व प्रौढ डास) असून तीन अवस्था हया पाण्यातील आहेत.पाण्यातील अवस्था नष्ट केल्यास डासाची उत्पत्ती रोखणे शक्य होईल. अंडीपासून डास तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे 8-10 दिवसांचा कालावधी लागतो. हिवतापाचा प्रसार करणाऱ्या ॲनाफीलीस या जातीच्या डासांची उत्पत्ती आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. उदा. डबके,नदी,नाले, पाण्याच्या टाक्या, भंगार सामान,रिकामी टायर्स, रांजण,माठ इ. हत्तीरोगाचा प्रसार करणाऱ्या क्युलेक्स जातीच्या डासाची उत्पत्ती ही प्रमुख्याने सेप्टीक टॅक, नाल्या, गटारे अशा ठिकाणी साठलेल्या घाण पाण्यामध्ये होते.डेंग्यु व चिकुनगुन्या या रोगाचा प्रसार करणाऱ्या एडीस एजिप्टाय या डासाची उत्पत्ती प्रामुख्याने आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठवलेल्या स्वच्छ पाणी साठयामध्ये होते. उदा. हौद,माठ,रांजण,रिकामी टायर्स, नारळाच्या करवंटया, कुलरमधील पाणी, ओव्हरहेड टँक, भंगार सामान, घर व घराच्या परिसरातील सर्व पाणी साठे, बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे. लक्षणे :- हिवताप :- थंडी वाजून ताप येणे,अंगदुखी, डोकेदुखी, उलटी, मळमळ इत्यादी डेंग्यू- तीव्र ताप, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे ईत्यादी. चिकुनगुन्या- ताप व तीव्र सांधेदुखी उपरोक्त रोगाची लक्षणे सर्व वयोगटात आढळून येतात व दुषित डास चावल्यानंतरच रोग होऊ शकतो. किटकजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना- किटकजन्य रागाचा प्रतिबंध करण्यासठी आपणामार्फत पुढील प्रमाणे उपाययोजना राबविण्यात याव्यात. आठवडयातून किमान एक वेळेस पाण्याचे सर्व साठे रिकामे करुन घासून पुसून स्वच्छ कोरडे करुन पुन्हा वापरावेत. पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावेत. डबकी व पाण्याच्या टाक्या मध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडा. पाणी वाहते करा, डबके बुजवणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, साठलेल्या डबक्यात, नाल्यात तेल, वंगण टाकावे. झोपताना अगरबत्ती व मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावेत.
निदान :-ताप आल्या किंवा उपरोक्त आजारांची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रक्ताची तपासणी करुन घ्यावी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालय स्तरावर डेंग्यू / चिकुनगुन्या / हिवतापाच्या निदानाची / मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध् आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

0 Comments